आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:राज्यात कोरोनाने शेकडो मृत्यू; सहकारसम्राट कुंभकर्णी निद्रेत

शिर्डी / नवनाथ दिघे9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • १८८ साखर कारखाने, १५० वर बाजार समित्या, २०० दूध संघ उदासीन

सर्वसामान्य जनता आणि सरकारच्या मदतीने साखर, शिक्षण आणि दूधसम्राट बिरुदावली मिरवून सत्तेच्या सुखाचे सोहळे पिढ्यान‌्पिढया साजरे करणारे हे सम्राट कोरोना महामारीत मदतीसाठी कुठेही पुढे येताना दिसत नाहीत. रुग्णालयात बेड नसल्याने रुग्णांचे होणारे हाल, रोज मृत्यूला कवटाळणारे शेकडो नागरिक, स्मशानात मृतदेहांना अग्निडाग देण्यासाठी लागणाऱ्या रांगा हे विदारक चित्र प्रत्येक जिल्ह्यात बघताना थरकाप उडतोय. मात्र या संकटात जनतेला आधार देऊन त्यांच्या ऋणातून उतराई होण्याची संधी असताना एखादा अपवाद वगळता राज्यातील १८८ साखर कारखाने, १५० च्या वर बाजार समित्या, दोनशेच्या आसपास दूध संघातील ‘सम्राट’ उदासीन आहेत.

राज्यात साखर उद्योगातून वार्षिक ९०० कोटी तर दूध, शिक्षण आदींतून ३०० कोटी रुपयांची उलाढाल होते. परंतु, यातील छदामही कोरोनाकाळात खर्च होत नाही. राज्यात सहकारी संस्थांची संख्या २ लाख १५ हजार असून सभासद सुमारे ५ कोटींच्या आसपास आहेत. या संस्थांमध्ये १० लाख कामगार आहेत. या मनुष्यबळाचा वापर झाल्यास कोरोनाचे चित्र बदलू शकते, परंतु, मालकच निद्रेत आहेत. सरकारच्या मदतकार्यात धार्मिक व सेवाभावी संस्था तसेच उद्योजक सरसावले आहेत. परंतु, गेल्या पन्नास वर्षांत सरकारच्या करोडो रुपयांच्या मदतीवर उभे राहिलेले साखर, दूध, शिक्षण आदी उद्योगांतील दिग्गज या आपत्तीत पुढे येऊन त्यांनी तात्पुरते कोविड रुग्णालय सुरू केले असते तर त्याचा लाभ त्या-त्या परिसरातील रुग्णांना झाला असता व गर्दी टळली असती. सरकारमध्ये सहभागी मंत्र्यांच्याही उद्योग समूहांमधून कोरोना रुग्णांसाठी कोणतीही उपाययोजना होत नाही. बाजार समित्याही या संकटात मदतकार्यात दिसत नाहीत. साखर कारखान्यांच्या माध्यमातून खासगी ट्रस्ट करून शिक्षणाच्या नावाखाली दुकानदारी करणारे शिक्षणसम्राटही अपवाद वगळता मदतीत कुठे दिसत नाहीत.

सर्व ट्रस्ट राजकीय कुटुंबीयांच्या मालकीचे
सभासदांच्या घामातून साखर कारखानदारांनी खासगी ट्रस्ट निर्माण केले. त्यावर मालकी सभासदांची राहिलेली नाही. सर्व ट्रस्ट राजकीय कुटुंबीयांच्या मालकीचे झाले आहेत. राज्यात दत्त कारखान्याचा अपवाद वगळता एकाही कारखान्याने सभासदांसाठी, शेतकरी आणि कामगारांच्या आरोग्यासाठी एका रुपयाचेही योगदान दिले नाही. - रघुनाथदादा पाटील, ज्येष्ठ शेतकरी नेते

हे करता येऊ शकते
- प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण संस्थांनी आपल्या शाळा, महाविद्यालयांच्या इमारती विलगीकरण कक्ष आणि सामान्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी दिल्यास प्रत्येक जिल्ह्यात किमान दहा हजार तर लॉज आणि हॉटेल्समध्ये दोन हजार रुग्णांची सोय होऊ शकेल. वेळीच नियोजन झाल्यास प्रत्येक जिल्ह्यात पन्नास हजार रुग्णांची सोय होऊ शकते.
- साखर कारखाने, दूध संस्था, बाजार समित्या, बँका, पतसंस्था, उद्योजक, मोठे व्यावसायिक, सेवाभावी संस्था, मंडळे, रोटरी, लायन्स क्लब विलगीकरण कक्षातील रुग्णांना नाष्टा, जेवण, पाण्याची सोय करू शकतात.

उलाढाल अब्जावधींची, कोरोनाकाळात या क्षेत्रातून एक छदामही खर्च नाही
राज्यातील साखर कारखान्यांनी कवडीमोल भावाने शेतकऱ्यांकडून जमिनी घेऊन सरकारी भागभांडवलावर कारखानदारी सुरू केली. त्यावर खासगी ट्रस्ट स्थापन करून शिक्षण संस्था व वैद्यकीय महाविद्यालये काढली. कोट्यवधींची कमाई केली. परंतु, कोरोना काळात या क्षेत्रातून एक छदामही खर्च होत नाही हे वास्तव आहे. - वसंतराव गुंजाळ, निवृत्त कार्यकारी संचालक, संगमनेर

सहकार क्षेत्रातील वार्षिक उलाढाल
900 कोटी रुपये साखर उद्योगांतून
300 कोटी दूध संघ,
शिक्षण संस्थांतून 5 कोटी सभासद
10 लाख या संस्थांत कामगार
2.15 लाख राज्यात सहकारी संस्था

बातम्या आणखी आहेत...