आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रहण:मनपाच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाचा निधी; बुरुडगाव रोडवरील नवीन हॉस्पिटलसाठी वळवला

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपाच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाला लागलेले ग्रहण सुटण्यास तयार नाही. राजकीय कुरघोड्यामुळे पुन्हा एकदा रुग्णालयाच्या नूतनीकरणाला ब्रेक लागला. जिल्हा नियोजन मंडळाने मंजूर केलेला ७ कोटींचा निधी बुरुडगाव रोडवर नवीन हॉस्पिटलसाठी वळवण्यात आला. त्यामुळे देशपांडे रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.

देशपांडे रुग्णालयाच्या सुमारे २० हजार स्क्वेअर फूट जागेत विस्तारित हॉस्पिटल उभारण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडे निधीसाठी प्रस्ताव करण्यात आला होता. महापालिका प्रशासनाने १७.८७ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता. ऑगस्ट २०२१ मध्ये बाळासाहेब देशपांडे रुग्णालयासाठी ७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याचा आदेश मनपाला प्राप्त झाला होता. त्यामुळे या रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचा व नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला होता.

देशपांडे रुग्णालयासाठी निधी मंजूर झाल्यानंतर बुरुडगाव रोडवरील महापालिकेच्या जागेत नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा देण्यासाठी सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव करण्यात आला. याबाबतचा प्रस्ताव १२ जानेवारी २०२२ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेसमोर सादर करण्यात आला होता. या सभेत कोणतीही चर्चा न होता ठराव मंजूर करण्यात आला. मनपाच्या ठरावानुसार पुन्हा जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी बुरुडगाव रोडवरील प्रस्तावित नवीन हॉस्पिटलसाठी निधी वापरण्याबाबतच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर मनपाने निविदा प्रक्रिया सुरू केली. सदर प्रस्ताव होत असताना शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनी बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलच्याच जागेवर नवीन इमारत उभारावी, अशी मागणी केली होती. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. तत्कालीन महापौर सुरेखा कदम यांच्या कार्यकाळातही बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलसाठी महापालिकेने निधी मंजूर केला होता. मात्र, त्यावेळीही राजकीय कुरघोड्या होऊन हा प्रस्ताव नाकारण्यात आला होता. राजकीय कुरघोड्यांमुळे दुसऱ्यांदा बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव हाणून पाडण्यात आला.

शिवसेना नगरसेवक बोराटेंचा आक्षेप
बुरुडगाव रोडवरील हॉस्पिटलच्या प्रस्तावित जागेला शिवसेना नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी आक्षेप घेतला. सदर जागा ही शाळेसाठी तत्कालीन जागा मालकाकडून मनपाने घेतलेली होती. विद्यमान शाळा वापर अशी नोंद या जागेवर आहे. शिक्षण संस्थेकडून या जागेसाठी मागणी करण्यात आली होती व महापालिका प्रशासनाने तसा प्रस्तावही यापूर्वीच मंजूर केला होता. त्यामुळे सदरच्या जागेचा शाळेसाठीच वापर व्हावा व हॉस्पिटलसाठी इतरत्र जागा निश्चित करावी, अशी त्यांची मागणी आहे.

असा आहे महासभेचा ठराव
चाहुराणा बुद्रुक येथे नवीन दवाखाना बांधण्यास ही सभा मान्यता देत आहे. बाळासाहेब देशपांडे दवाखान्यासाठी प्राप्त निधीतून जुनी इमारत पाडून नव्याने बांधकाम करावयाच्या कामास बराच अवधी लागणार आहे. इमारत तातडीने पाडल्यास सद्यस्थितीत सुरू असलेल्या दवाखान्याची सुविधा नागरिकांना देण्यास अडचणी येतील. याकरिता देशपांडे दवाखान्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी. प्राप्त झालेला निधी परत जावू नये, यादृष्टिने सदरचा निधी चाहुराणा बुद्रूक येथे दवाखाना बांधकामासाठी वापरण्याबाबत पयोग्य ती कार्यवाही करावी.

देशपांडे हॉस्पिटलसाठीच निधी वापरावा
बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलचे नूतनीकरण व विस्तारीकरण आवश्यक आहे. नगर शहरासह जिल्ह्यातील गोरगरीब महिला रुग्णांना या उपक्रमाच्या माध्यमातून चांगली सेवा मिळते. शहराच्या मध्यवर्ती परिसरात ही जागा असल्यामुळे सर्वांसाठी सोयीस्कर आहे. शासनाकडून मंजूर झालेला निधी हा बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलसाठी असल्याने त्यासाठी हा निधी वापरावा व नवीन हॉस्पिटलसाठी शासनाकडे नव्याने प्रस्ताव करावा.''
संभाजी कदम, शहरप्रमुख, शिवसेना.

बातम्या आणखी आहेत...