आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीवरुन कचरा वाहतूक:नगर महापालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

अहमदनगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील कचरा संकलन व वाहतुकीसाठी महापालिकेने ठेका दिलेल्या स्वयंभु ट्रान्सपोर्ट विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने दिले आहेत. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी दाखल केलेल्या याचिकेवर प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी हा निकाल दिला आहे.

कोरोना काळात केलेल्या कचरा संकलनाची वाढीव बिले स्वयंभु ट्रान्सपोर्टने दिल्याची तक्रार गिरीश जाधव यांनी महापालिकेकडे केली होती. महापालिकेने यासंदर्भात कोणतीही कारवाई न केल्याने त्यांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांनी सदर याचिका फेटाळली होती. त्यानंतर जाधव यांनी पुन्हा जिल्हा न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली होती. स्वयंभु ट्रान्सपोर्ट, तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकलवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी संगनमताने खोटी बिले सादर करून महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी जाधव यांनी केली होती. त्यावर जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी निकाल दिला आहे.

स्वयंभु ट्रान्सपोर्टने बिले सादर करताना दुचाकी वाहनांचे नंबर असलेल्या गाड्यांची बिले दिलेली होती, असा दावा जाधव यांनी केला होता. याबाबत पुरावेही त्यांनी सादर केले होते. या आधारावर न्यायालयाने स्वयंभु ट्रान्सपोर्ट विरोधात पोलिस ठाण्यात कलम 420, 467, 468 अन्वये गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तत्कालीन आयुक्त मायकलवार व डॉक्टर बोरगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी शासनाची परवानगी आवश्यक असल्याचा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला होता. तो ग्राह्य धरण्यात आल्यामुळे या दोघांबाबत अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांनी दिलेला निकाल जिल्हा न्यायाधीश यांनी कायम ठेवला आहे. जाधव यांच्या वतीने अ‌ॅड. अभिजित पुप्पाल यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...