आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधायक:गुन्हेगारीचा शिक्का पुसण्यासाठी ‘तो’ करतोय भाजीविक्री; गुन्हेगारी निर्मूलन आणि पुनर्वसन प्रकल्पांतर्गत लोकशिक्षण प्रतिष्ठानचा उपक्रम

श्रीगोंदे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुन्हेगारीचा शिक्का पुसण्यासाठी श्रीगोंदे तालुक्यातील विशाल भोसले हा सध्या भाजीविक्रीचा व्यवसाय करतो आहे.

एकदा गुन्हेगारीचा शिक्का बसला की तो पुसला जाणं अवघड, पण हा समज श्रीगोंदे तालुक्यातील विशाल भोसले या युवकानं खोटा असल्याचं आपल्या कृतीतून सिद्ध केलं आहे. आपल्यावरील गुन्हेगारीचा शिक्का पुसण्यासाठी झाले गेले सर्व विसरून तो आता प्रामाणिकपणे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो आहे. विशाल म्हणाला, नातेवाइकांच्या चुकीमुळे मला ६ महिने २० दिवस तुरुंगात घालवावे लागले. समाजात काय तोंड दाखवू, या विचाराने मी भांबावून गेलो होतो. आता तू काही केलंस किंवा नाही केलंस, तरी पोलिसांचा ससेमिरा तुझ्या पाठीमागे लागणार आहे. त्यामुळे तू आता खरंच असे गुन्हे कर, असा सल्ला तुरुंगातील मंडळी देत होते. दुसरीकडे मला सोडवण्यासाठी कुटुंबीयांना होणाऱ्या त्रासाच्या बातम्या कानावर येत होत्या. नरक यातनांनी व्यथित होत होतो. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर काही दिवस मी व माझ्या कुटुंबीयांनी प्रचंड तणावात घालवले, पण भाजीविक्री सुरू केल्यानंतर आता मला पुन्हा माणसात आल्यासारखं वाटत आहे.

लोकशिक्षण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद काळे म्हणाले, पारधी समाज म्हणजे हा जंगलात शिकार करून जगणाऱ्यांपैकी आदिमम आदिवासी समाज आहे. इंग्रजांनी शिकारीवर बंदी घालून जंगलाबाहेर काढलेला हा समाज मुख्य प्रवाहात सामील करून न घेतल्यामुळे उपजीविकेसाठी गुन्हेगारीच्या मार्गास लागला. इंग्रजांनी विशेष कायदा करून त्यांच्यावर ‘जन्मजात गुन्हेगारी जमात’ असा ठसा मारला. तो आजही कायम असल्याने काही युवकांना संशयावरून गुन्हेगार ठरवले जाते. काहींचा प्रत्यक्ष संबंधही आढळून येतो. मात्र, त्यामुळे कित्येकांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले आहेत. ही बाब लक्षात घेऊन लोकशिक्षण प्रतिष्ठानने ‘सराईत गुन्हेगारी निर्मूलन आणि पुनर्वसन प्रकल्प’ हाती घेतला. रस्ता भटकलेल्या चोरी, दरोडे, घरफोडीचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या, परंतु बदलाच्या भूमिकेत असलेल्या नगर जिल्ह्यातील ५० युवक आणि त्यांच्या कुटुंबाचे समुपदेशन करुन गुन्हे करण्यापासून परावृत्त केले जाते. शासनाचे विविध विभाग, एनजीओ व दानशूर व्यक्तींच्या मदतीने त्यांचे सन्मावपूर्वक पुनर्वसन करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे काळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...