आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चासत्र:सुबाभूळची लागवड हा शेतीला उत्तम पर्याय; जालना येथील शेतकरी विलास दहिभाते यांचे प्रतिपादन

श्रीरामपूर6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुबाभूळ लागवड व शेती हा आजच्या काळात शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन जालना येथील तज्ञ शेतकरी विलास दहिभाते यांनी केले .येथील मराठा समाज बहुउद्देशीय विकास सेवा प्रतिष्ठाणने आयोजित केलेल्या सुबाभूळ लागवड, एक किफायतशिर शेती या चर्चासत्रात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

यावेळी जे. के. पेपर लिमिटेडचे (सोनगढ, जि. तापी, गुजरात) सुबाभूळ लागवड विभाग व्यवस्थापक डॉ. सत्यविर सिंग, उद्योजक किशोर निर्मळ,संस्थापक विलास जाधव,आत्मा विभागाच्या तालुका व्यवस्थापन समितीच्या मिनाक्षी बढे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर प्रतिष्ठानचे अध्यक्ष भागवत लासुरे अध्यक्षस्थानी होते.दहिभाते म्हणाले, सुबाभळीची जात जे. के. पेपर कंपनीच्या प्रयोगशाळेत बनवली आहे. ती लागवडीनंतर १८ महिन्यांनी कापणीला येते.

एकदा रोपे लावले की ते १२ वर्षापर्यंत चालते. तोपर्यंत त्याच्या सहा कापण्या होतात. प्रतिएकर ३५ ते ४० टन वजन मिळते.३ हजार ६०० रूपये प्रतिटन असा दर मिळतो. झाडांच्या फांद्या तोडणी, ट्रकमध्ये भरणे व घेऊन जाणे हा खर्च व व्यवस्था कंपनी करते. झाडाला फवारणी करण्याची गरज नसते.याला कुठल्याही प्रकारची जमीन चालते.

हमी म्हणून कंपनी शेतकऱ्यांबरोबर करारनामा करते. बियाणे लागवड करता येते किंवा कंपनी दीड रुपया प्रतरोपाने तयार रोपांचा पुरवठा करते. पारंपारीक शेती करणे अवघड झाल्याने व सध्या शेतकरी करत असलेल्या शेतीचे उत्पन्न पाहता सुबाभूळ शेतीचे उपन्न जास्त मिळते व विक्रीची हमी मिळते. याप्रसंगी प्रगतशिल शेतकऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरुपात मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

त्यात राजेंद्र आहेर (लोणी), चंद्रकांत देवकर (निपाणी वडगाव), मच्छिंद्र बनसोडे (भामाठाण), सुनील रंधे, (खंडाळा), सर्जेराव कासार (वडाळा महादेव) व विशाल गाडे (बारगाव नांदूर) यांचा समावेश आहे. याप्रसंगी कृषी खात्याच्या आत्मा विभागाच्या तालुका व्यवस्थापन समितीच्या मिनाक्षी बढे उपस्थित होत्या. त्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्या, बचत गट, शेतकरी गट व शेतकऱ्यांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती दिली. प्रास्तविक प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष उद्योजक किशोर निर्मळ यांनी, सुत्रसंचालन आकाश मोरगे यांनी, तर आभार प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष विलास जाधव यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...