आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिढा:बाजार समिती निवडणुकीबाबत नव्या परिपत्रकाने राजकीय वर्तुळात उत्सुकता

श्रीरामपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाच्या सहकार,पणन व वस्रोद्योग विभाग मंत्रालयाने २९ नोव्हेंबर रोजी डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाजारसमिती निवडणुकीबाबत परिपत्रक काढले आहे. श्रीरामपूर बाजारसमिती निवडणुकीबाबत त्यानुसार कार्यवाही होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. बुधवार दि ३० रोजी निवडणूक घेण्याबाबत मुदतवाढ मिळावी, या राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या विनंतीला न्यायालयाने १५ मार्चपर्यंत हिरवा कंदील दिला आहे.

त्यात सहकार व वस्रोद्योग मंत्रालयाने २९ नोव्हेंबर रोजी या संदर्भात एक परिपत्रक काढले आहे. त्यात म्हटले आहे, राज्य निवडणूक आयोगाने दिनांक ९ नोव्हेंबरच्या आदेशान्वये १८ नोव्हेंबर ते दिनांक २० डिसेंबर या कालावधीत राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे. या ग्रामपंचायतींचा निकाला दिनांक २० डिसेंबर रोजी असून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना २३ डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच ७ हजार १४७ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरु केला आहे.

सहकारी संस्थांचे कार्यक्षेत्र एक किंवा अनेक तालुक्यांशी संबंधित असल्यामुळे बरेचसे मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त मतदारांना निवडणूकीत सहभाग नोंदविता यावा, यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ क मधील तरतूदीनुसार शासनास प्राप्त झालेल्या अधिकारात, वर्ग क, तसेच, वर्ग इ प्रकारच्या सहकारी संस्था, त्याचप्रमाणे ज्याप्रकरणी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशित केले आहे.

अशा सहकारी संस्था वगळून, राज्यातील अ व ब वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणूका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर दिनांक २० डिसेंबर, २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत. ज्या वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणूका या आदेशान्वये पुढे ढकलण्यात आलेल्या नाहीत त्यांच्या निवडणुका घेण्याबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करून निवडणूका घेण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी, असे नमूद करण्यात आले आहे.

श्रीरामपूर बाजार समिती निवडणुकीबद्दल संभ्रम
श्रीरामपूरची निवडणूक घेण्यास न्यायालयाने मुदतवाढ दिली आहे. मात्र या बाबत दाखल इतर याचिकांवर १५ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यात असा आदेश आला आहे. त्यामुळे श्रीरामपूरच्या निवडणूकीबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण या आदेशाचा आधार घेणार की न्यायालयाने दिलेला निर्णय, की १५ तारखेला इतर याचिकावर अजून काही वेगळा निर्णय येईल, या बाबत श्रीरामपूरच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

एकाच कालावधीत सहकार संस्थेच्या निवडणुका
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत निवडणुक लागलेल्या अ वर्ग ३८, ब वर्ग १ हजार १७०, क वर्गातील ३ हजार १५१ व ड वर्गातील २ हजार ७८८ सहकारी संस्था आहेत. राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका व सहकारी संस्थांच्या निवडणुका एकाच कालावधीत सुरु असल्याने गावागावामध्ये तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, अ व ब वर्गातील सहकारी संस्थांच्या सदस्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

बातम्या आणखी आहेत...