आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री ९.३० वाजता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा', असे बनावट मॅसेज नागरिकांना पाठवण्यात येत आहेत. अशा प्रकारचे एसएमएस व व्हॉट्सअप मेसेज महावितरणकडून पाठवण्यात येत नाही. त्यामुळे या मेसेजला प्रतिसाद वा उत्तर देऊ नये, असे महावितरणकडून सांगण्यात आले.
कॉलला प्रतिसाद देऊ नका
वेगवेगळ्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून पाठवण्यात येणाऱ्या अशा मेसेज किंवा कॉलला नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये. बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून एखादी लिंक पाठवण्यात आली असेल तर संपूर्णपणे दुर्लक्ष करावे. अन्यथा आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे, असा इशाराही महावितरणने दिला आहे.
अधिकृत मॅसेज असे ओळखा
महावितरणकडून केवळ मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टीमद्वारे एसएमएस पाठवण्यात येतात. महावितरणचे मॅसेज VM-MSEDCL किंवा VK-MSEDCL या नावाने येतात. तसेच, या अधिकृत मेसेजमधून कोणालाही कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे कळवले जात नाही, अशी माहितीही देण्यात आली आहे.
केवळ देखभाल, दुरुस्तीचे मॅसेज
महावितरणकडून केवळ पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा कालावधी, याबाबत मॅसेज पाठवले जातात. तसेच द,रमहा वीजबिलांची रक्कम, स्वतःहून मीटर रिडींग पाठवण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रिडींग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस आदींची माहिती पाठवण्यात येते.
तक्रारीसाठी संपर्क साधा
वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठवण्यात येणारे मेसेज हे बनावट आहे व त्यातून आर्थिक फसगत होऊ शकते, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. त्यामुळे वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या महावितरणशी संबंधित एसएमएस किंवा अन्य मेसेज, कॉल तसेच पेमेंटच्या लिंकला नागरिकांनी प्रतिसाद किंवा कोणतेही उत्तर देऊ नये. मेसेजमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू नये. काही शंका व तक्रारी असल्यास वीजग्राहकांनी चोवीस तास सुरु असलेल्या १९१२, १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांक किंवा नजीकच्या महावितरण कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.