आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मांडओहळ प्रकल्प वाहतोय ओसंडून:पाणलोटात दमदार पाऊस झाल्यानं भरलं धरण; लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांतून समाधान

अहमदनगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाणी टंचाईच्या काळात पारनेर तालुक्यातील जनतेसाठी जीवनदायीनी ठरणारा मांडओहळ मध्यम प्रकल्प शनिवारी रात्री पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला. अपुऱ्या पावसामुळे गेल्या वर्षी धरण भरले नव्हते. यावर्षी धरण भरल्याने पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मांडओहळ प्रकल्पची एकूण साठवण क्षमता 399 दशलक्ष घनफूट आहे, तर धरणाचा उपयुक्त पाणी साठा 310 दशलक्ष घनफूट आहे. मागील काही दिवसांपासून पळसपूर, नांदुर पठार, सावरगाव परिसरासह मांडओहळ प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले आहे. सातत्याने पाऊस झाल्याने ऑगस्ट अखेर धरण पूर्ण क्षमतेने भरेल, असा अंदाज लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला होता, तो आता खरा ठरला असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पाणी टंचाईच्या काळात प्रत्येक वर्षी साधारण एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी मांडओहळ धरणातील पाण्यावर अवलंबून रहावे लागते. या काळात पारनेर तालुक्यातील बहुतांशी गावांच्या पाणी योजनांचे उद्भव कोरडे पडतात. त्यामुळे मांडओहोळ धरणातून पारनेर तालुक्यातील गावांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. पाणी टंचाईच्या काळात मांडओहळ धरण पारनेर तालुक्यातील जनतेसाठी जीवनदायीनी ठरते. दरम्यान यावर्षी पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यामुळे मांडओहळ प्रकल्प प्रथमच ओसंडून वाहत आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतीसह विविध गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकरी आनंद व्यक्त करत आहेत.

धरणातील गाळ काढण्याने साठवण क्षमता वाढली

चार वर्षांपूर्वी, 2018 साली मांडओहोळ धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पाठ फिरवल्याने धरणात नवीन पाण्याची आवक झाली नव्हती. एप्रिल 2019 सर्व पाणी संपल्याने धरण कोरडे पडले होते. त्यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी धरणातील साचलेला गाळ वाहून नेला. त्यामुळे धरणाची खोली वाढण्या बरोबरच साठवण क्षमतेतही वाढ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...