आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसळधार पावसामुळेत ओढे-नाले तुडुंब:अतिवृष्टीमुळे सोयाबिनसह खरिपाचे नुकसान

नगर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्ह्यात विविध भागात झालेल्या मुसळधार पावसामुळेत ओढे-नाले तुडुंब भरले आहेत. नगर व राहुरी तालुक्यात गर्भगिरी डोंगर परिसरातील गावांत अतिवृष्टीमुळे खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच लहान-मोठी गावतळीही ओसंडून वाहती झाली आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ७ लाख ३९ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिली आहे. पावसाच्या बरसत असलेल्या श्रावणधारा खरिपासाठी दिलासादायक ठरत असल्या, तरी काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात खरिपाचे अंदाजीत सरासरी क्षेत्र ६ लाख ७४ हजार ४६१ हेक्टर आहे, परंतु यंदा खरिपाच्या पेरणीत वाढ झाली आहे. तब्बल १०९ टक्के पेरणी झाल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. सोयाबिन, बाजरी, तूर आदी पिकांची पावसाने उसंत दिल्याने मागील आठवड्यात खूरपणी झाली. बुधवारी रात्री अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. रात्री दोन वाजेपर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील विविध भागात ओढे-नाले ओसंडून वाहू लागले. गर्भगिरी लगतच्या नगर तालुक्यातील डोंगरगण, गुंजाळे, वांबोरी, कुक्कडवेढे या गावातील पिकांचे मोठे नुकसान झाले. वांबोरीत गावतळी तुडुंब भरली असून शेतात दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. मेघ गर्जनेसह रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे अनेकांनी रात्र जागून काढली.

शेतकऱ्यांनी टाकलेले कांद्याचे रोप, सोयाबिन, तूर, बाजरीचे पाणी साचल्याने मोठे नुकसान झाले असल्याने महसूल प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईची कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.

वांबोरी घाट रस्त्याचे नुकसान
वांबोरी घाटात बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे रस्त्याचे मोठे नुकसान झाले आहे. घाटातील रस्ता दुरुस्तीचे काम वनविभागाच्या आक्षेपामुळे अर्धवट आहे. त्यातच मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या साईड पट्टी वाहून गेल्या आहेत. तसेच भरसाखळ वस्तीजवळ झाडे उन्मळून पडली आहेत. वांबोरी मंडलात एकाच रात्री सर्वाधिक १०३ मिलीमिटर पावसाची नोंद झाली.

बातम्या आणखी आहेत...