आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअवकाळी व वादळी पावसाने रब्बीच्या पिकांवर अवकळा आणली आहे. नगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, हरभरा पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारी स्तरावरून पंचनाम्याच्या आदेशाची प्रतीक्षा लागली आहे. जिल्ह्यातील १५१ गावांमधील ४ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नगर शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सोमवारी (ता. ६) रात्री विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सोमवारी मध्यरात्रीही बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली होती. मंगळवारी पहाटे व दिवसभर कमी-जास्त प्रमाणात जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. जिल्ह्याच्या बहुतांशी तालुक्यांमध्ये अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
प्रामुख्याने नगर जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने गहू, हरभरा, कांदा या नगदी पिकांचे क्षेत्र वाढले होते. रब्बी हंगामात पिकांचे क्षेत्र वाढले असताना, अवकाळी पावसाने या पिकांवर अवकळा आणली आहे. ग्रामीण भागात काढणीला आलेल्या गव्हावर अवकाळी पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. अनेक भागात हातातोंडाशी आलेले गव्हाचे पीक झोपले आहे. हरभरा, ज्वारी, कांदा पिकांचीही तीच अवस्था आहे. पालेभाज्या व फळबागांचेही अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे.
पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत
अवकाळी पावसामुळेशेतकर ी वर्ग अडचणीत आला आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तातडीने मंत्री व प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे, मात्र सरकार गांभीर्याने घेत नसल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केली.
प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश
नगर जिल्ह्यात ७ ते ९ मार्च दरम्यान अवकाळी पाऊस व गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत. मेघगर्जनेच्या वेळी विजा चमकत असताना, वादळी वारे सुरू असताना नागरिकांनी झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.
प्राथमिक पाहणीनंतरच पंचनामे
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या पिकांच्या प्राथमिक पाहणीनंतर पंचनामे करण्यात येतील. त्यासाठी सर्वे करण्याचे निर्देश सर्व तहसील यंत्रणेला दिले आहेत. सिद्धाराम साळीमठ, जिल्हाधिकारी.
सर्वेनंतर नुकसान स्पष्ट होईल
अवकाळी व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक टप्प्यात नुकसानीचे सर्वे करण्याचे काम सुरू असून, सर्वेक्षणानंतरच किती हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेय, त्याचा अंतिम अहवाल येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.