आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांची ई-मस्टरवर ऑनलाइन नोंदणी करणारे राज्यातील ३ हजार ७६५ सहायक तांत्रिक कार्यक्रम अधिकारी, डाटा एंट्री ऑपरेटर या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या राज्यातील १ लाख १३ हजार ६७८ मजुरांचा दोन दिवसांपासून रोजगार थांबला आहे. परिणामी राज्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या जवळपास १० हजार ४९७ कामांना ब्रेक लागला आहे.
रोहयोअंतर्गत कंत्राटी पद्धतीने काम करणारे सहायक तांत्रिक कार्यक्रम अधिकारी, डाटा एंट्री ऑपरेटर बुधवारपासून संपावर आहेत. दोन दिवसांपासून हा संप सुरू आहे. गुरुवारीदेखील डाटा एंट्री ऑपरेटर संपावर होते. संपामुळे रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरांची ई-मस्टरवर होणारी दैनंदिन ऑनलाइन नोंदणी थांबली आहे.
राज्यातील ३ हजार ७६५ डाटा एंट्री ऑपरेटरचे काम बंद असल्यामुळे त्याचा फटका ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरांना बसला आहे. गुरुवारी (२ फेब्रुवारी) मुंबई व मुंबई उपनगर वगळता राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये १० हजार ४९७ रोजगार हमी योजनेची कामे होती. या कामांवर १ लाख १३ हजार ६७८ मजुरांना रोजगार मिळणार होता. मात्र संपामुळे गेल्या दोन दिवसांपासून हे मजूर घरी बसून आहेत. ई-मस्टरवर ऑनलाइन नोंदणी केल्यानंतरच मजुरांना २५६ रुपये दिवसाला मजुरी दिली जाते. दरम्यान, केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणारी रोजगार हमी योजना आहे. त्यामाध्यातून ग्रामीण भागातील छोटी-मोठी कामे केली जातात. प्रत्येक कुटुंबाला शंभर दिवस रोजगार मिळावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. दोन दिवसांत पाच कोटी रुपये मजुरांना मजुरीपोटी मिळणार होते.
३ लाखांहून अधिक मजूर झाले कमी दहा दिवसांपूर्वी राज्यात रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरांची संख्या ५ लाख होती. डाटा एंट्री ऑपरेटर संघटनेने १८ जानेवारी एकदिवसीय संप केला होता, तर २५ जानेवारीपासून असहकार आंदोलन सुरू केले होते. आता बुधवारपासून (१ फेब्रुवारी) संघटनेने काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्याचा परिणाम मजुरांच्या संख्येवर झाला असून केवळ रोजगार हमी योजनेवर १ लाख १३ मजुरांची संख्या आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात सर्वात कमी मजूर : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यामध्ये केवळ ४ रोजगार हमी योजनेची कामे सुरू होती. त्यावर जवळपास ३८ मजूर काम करत होते. नंदुरबार जिल्ह्यात ७४, ठाणे जिल्ह्यात ४९ मजूर कामावर होते. कोल्हापूर, धुळे, बुलडाणा आणि हिंगोली या जिल्ह्यांत मात्र एकही मजूर रोजगार हमी योजनेवर उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.
गडचिरोलीत १ हजार कामे थांबली, परभणीत सर्वाधिक मजूर घरीच बसून डाटा एंट्री ऑपरेटरच्या संपाचा सर्वाधिक फटका राज्यातील सर्वाधिक रोजगार हमीवर काम करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील ३४ हजार ३२४ मजुरांना बसला असून, गडचिरोलीमधील सर्वाधिक १ हजार ३५३ कामे थांबली आहेत. त्याखालोखाल परभणी जिल्ह्यातील १३ हजार ४३७ मजुरांना फटका बसला आहे. या जिल्ह्यात सुमारे १ हजार ४१९ रोजगार हमी योजनेची कामे करण्यात येत होती.
रोजगार हमीपेक्षा शेतीतील कामांवर चांगली मजुरी, दिवसाला २५६ रु. मजुरी रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामावर मजुराला दैनंदिन २५६ रुपये मजुरी मिळते. वाढत्या महागाईच्या तुलनेत ही मजुरी कमी असल्यामुळे ग्रामीण भागातील मजूर शेतीची कामे, गवंडी कामे याला प्राधान्य देताना दिसत असून या कामावर त्यांना ३५० ते ५०० रुपये दैनंदिन मजुरी दिली जाते. अल्प मजुरी मिळत असल्यामुळे रोजगार हमी योजनेकडे मजूर पाठ फिरवताना दिसत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.