आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घडले माणुसकीचे दर्शन..!:देवदर्शन सोडून15 दिवसांपूर्वी हरवलेल्या मुकबधीर आजीला सापडून दिले घर; व्हाॅट्सअ‌ॅपवरून पटवली ओळख

अहमदनगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजीबाई हरवल्यानंतर घरच्यांनी खूप शोधले पण पंधरा दिवस होऊनही त्या सापडल्या नाहीत. आजीबाई मुकबधीर असल्याने ती परतेल अशी कुटुंबियांनीही आशा सोडली पण या कुटुंबाच्या मदतीला एक शिक्षक दाम्पत्य आले, त्यांनी देवदर्शन बाजूला ठेवत आधी आजीचा कुटुंबाशी समन्वय घडवून आणला. त्यासाठी त्यांनी व्हाॅट्सअ‌ॅपवर फोटो पाठवला तो व्हायरल होताच कुटुंबियांनी संवाद साधून तिला नातेवाईकांच्या हवाली केले. हा प्रकार एक सप्टेंबरला घडला अन् त्याची माहिती आज समोर आली.

त्यांनी जपली माणूसकी

वीरगाव येथील आदिवासी पोकळे कुटुंबातील मूकबधिर वृद्धा सापडून देण्याचे अनमोल कार्य अकोले तालुक्यातील वीरगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक देविदास गिऱ्हे व त्यांच्या पत्नी जीजा या शिक्षक दाम्पत्यानी केले. गिऱ्हे यांनी वज्रेश्वरी देवीच्या सपत्निक दर्शनाला प्राधान्यक्रम देण्याऐवजी माणूसपण जपत, वृद्धेला नातेवाईकांच्या ताब्यात देऊनच पुढे देवीच्या दर्शनाला गिऱ्हे रवाना झाले.

त्यांना दिसली ओळखीची महिला

वीरगाव येथील जि. प. शाळेतील प्राथमिक शिक्षक देविदास गिऱ्हे हे सपत्निक गुरुवारी (1 सप्टेंबर) इगतपुरी तालुक्यातील वज्रेश्वरीला जायला निघाले. इगतपुरीच्या पुढे त्यांची गाडी चालवत निघाले असतानाच त्यांची पत्नी जीजा हीस रस्त्याच्या विरुद्ध दिशेने चालत येणारी एक वृद्धा ओळखीची वाटली. हे त्यांनी पतीला सांगितले. दरम्यान यावरील चर्चेत दोन अडीच मिनिटे गेली. देविदास यांना अचानक आठवले की, सोमवारी वीरगावात क्षेत्रभेटीला गेलो तेव्हा गावातील मुकी महिला बेपत्ता झाल्याची चर्चा वृद्धेच्या नातेवाईक व नागरिकांत होती. हे आठवल्यावर देविदास यांनी यू टर्न घेतला. गाडीतून उतरून आपल्या मोबाइलवर त्या वृद्धेचा फोटो घेतला व व्हॉट्सऍपवरून गावाकडील नातेवाईकांना पाठवला.

व्हॉट्सऍपवरून पटली ओळख

व्हॉट्सऍपवरून तो फोटो व्हायरल झाल्यानंतर वृद्धेच्या नातेवाईकांनी देविदास यांना संपर्क साधून क्ळवले, हीच आमची पोकळे आजी आहे. त्यातून नातेवाईकांच्या जीवाची घालमेल सुरू झाली. पंधरा दिवसांपासून शोधाशोध करूनही निराशाच पदरी पडलेली. नातेवाईकांनी आजी सापडेल म्हणून आशा सोडून दिलेली. त्यात या वृद्धेला बोलता येत नव्हते.

आधी घरी पाठवले मग देवदर्शन

देविदास यांना वज्रेश्वरीला जायचे म्हणून पहाटेच निघाले होते. सकाळी साडेसात वाजता त्यांना रस्त्यावरून प्रवास करताना ही वृद्धा दिसली. सकाळी 11.30 वाजता वृद्धेचे नातेवाईक गिऱ्हे यांच्याजवळ पोहोचले. हरवलेली आजी न सापडण्याची आशा सोडलेल्या कुटुंबियांना आजी भेटल्याचा आनंद तिच्या मुलांसह नातवांना झाला होता. त्यांनी गिऱ्हे दाम्पत्याला धन्यवाद दिले. कुटुंबासमवेत वृद्धेला गाडीत बसवून दिल्यानंतरच गिऱ्हे दाम्पत्य वज्रेश्वरीकडे रवाना झाले.

समाजात अजुनही माणुसकी शाबूत

वीरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील माझे सहकारी गिऱ्हे यांनी वज्रेश्वरी देवीच्या सपत्नीक दर्शनाला प्राधान्यक्रम देण्याऐवजी माणूसपण जपले. देवदर्शनाहून मोठं पुण्य लाभले. आपल्या अस्तित्वाने हे जग सुंदर होण्यासाठी प्रयत्न करणारी देविदास व जीजा सारखी माणसं जगात आहेत म्हणूनच अजूनही समाजात माणुसकी शाबूत आहे. पण माणुसकी नष्ट होईल त्या दिवशी जग बुडेल. शाळेत परिपाठात मी मुलांना ही गोष्ट सांगितल्यावर गुलाबाचे फूल आणि शाल देऊन देविदास यांचा सपत्नीक सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली, वीरगाव शाळेतील शिक्षक भाऊ चासकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...