आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुरक्षेच्या दृष्टिकोनातून नगर शहरासह शिर्डी व शिंगणापूर या दोन तीर्थक्षेत्रांच्या शहरांत प्रमुख रस्ते व चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.
नगरसह शिर्डी व शनिशिंगणापूर शहराचा दिवसेंदिवस विस्तार वाढत आहे. रहदारी वाढत आहे. गुन्हेगारीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. मंगळसूत्र चोऱ्या, पैशांच्या बॅग पळवणे अशा घटनाही वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रमुख रस्ते व चौकांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. येत्या काळात ही मागणी पूर्ण होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. जिल्हा पोलिस प्रशासनाने या दृष्टीने पावले उचलली आहेत.
अधीक्षक ओला म्हणाले की, प्रमुख शहरांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनेतून यासाठी निधी उपलब्ध होऊ शकतो. त्यादृष्टीने जिल्हा नियोजन मंडळाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर तिनही शहरांमध्ये सर्वेक्षण करून ठिकाणे निश्चित केली जातील. त्यानंतर निधीसाठी प्रस्ताव दिला जाणार आहे. नाविन्यपूर्ण योजनेतून हे काम मार्गी लावण्याचे प्रयत्न आहेत.
भिंगार पोलिस ठाण्यासाठी नवीन इमारत, नगर तालुका पोलिस ठाण्याचे स्थलांतर आदी प्रस्तावही विचाराधीन असल्याचे अधीक्षक ओला यांनी सांगितले. नगर तालुका पोलिस ठाणे शहरापासून लांब असल्याने नागरिकांना अडचणी येतात. त्यामुळे इतर शासकीय कार्यालयांच्या जवळ हे पोलिस ठाणे असावे, अशा सूचना खासदार सुजय विखे यांनी केल्या होत्या. त्यानुसार हे दोन्ही विषय विचाराधीन असल्याचे पोलिस अधीक्षक ओला यांनी सांगितले. खासदार सुजय विखे यांनीही पत्रकारांशी बोलताना या स्थलांतराबाबत संकेत देऊन जिल्हा नियोजन मंडळातून निधी उपलब्ध करून देण्याबाबत सुचित केले होते.
पाच कोटींचा निधी राहिला अखर्चित जिल्हा पोलिस प्रशासनाकडे सुमारे पाच कोटींचा निधी दोन वर्षांपूर्वी उपलब्ध झाला होता. तो खर्च झाला नाही. त्यातून पोलिस ठाण्याच्या इमारतीची दुरुस्ती, नवीन इमारत, वाहन खरेदी प्रस्तावित होती. या निधीच्या वापरासाठी पुन्हा मंजुरी घ्यावी लागणार आहे. त्यातून भिंगार पोलिस ठाण्याच्या नवीन इमारत बांधणी करता येईल का, याबाबतही प्रयत्न सुरू असल्याचे अधीक्षक ओला यांनी सांगितले.
तत्कालीन अधीक्षकांनीही दिला होता निधीचा प्रस्ताव तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनीही िभंगार पोलिस ठाण्याच्या सध्याच्या इमारतीचे नगर तालुका पोलिस ठाण्याजवळील जागेत स्थलांतर करण्यासाठी व तेथे नवीन इमारत उभारण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. जिल्हा नियोजन मंडळातून सुमारे एक ते दीड कोटी रुपयांच्या निधीची मागील केली होती. मात्र, जुना निधी अखर्चित असल्याने हा प्रस्ताव रखडल्याचे समोर आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.