आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संचालक मंडळ:‘संत शिरोमणी गोरोबाकाका मातीकला बोर्ड संचालक मंडळ घोषित करा’ ; जाचक अटी रदद करून कुंभार समाजाला ओळखपत्र द्यावे

कोपरगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभार समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व व्यावसायिक विकासाच्या दृष्टींने संत शिरोमणी गोरोबाकाका मातीकला बोर्डची घोषणा करून १० कोटी रूपयांची तरतुद केली होती. मात्र महाविकास आघाडी शासनाने अडीच वर्षात याबाबत काहीही केलेले नाही. सरकारने गोरोबाकाका मातीकला बोर्ड संचालक मंडळाची घोषणा करून आर्थीक तरतुद करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

भाजपाचे गोपिनाथ गायकवाड, ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष जगदिश मोरे, कुंभार समाजाचे शहराध्यक्ष संदिप वाकचौरे, भाजपा उत्तर नगर जिल्हा ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष दिपक राऊत यांनी निवेदनाद्वारे राज्य सरकारकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील सकल कुंभार समाजाच्या उत्कर्षासाठी महाविकास आघाडी शासनाने कुठलेही ठोस कार्य केले नाही. तातडीने मातीकला बोर्डची घोषणा न केल्यास आघाडी सरकारच्या विरोधत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.

कुंभार समाजाचा एन टी प्रवर्गात समावेश करावा, गोरोबाकाकांचे जन्मस्थान तेरढोकी (उस्मानाबाद) तीर्थक्षेत्रास देहु आळदींप्रमाणे पर्यटनस्थळाचा दर्जा देवुन त्याचा विकास करावा, कुंभार समाजाला विधान परिषदेवर प्रतिनिधीत्व द्यावे, मातीवर आकारली जाणारी रॉयल्टी माफ करावी, माती वाहतुक व वीटभटटी परवान्याच्या जाचक अटी रदद करून कुंभार समाजाला ओळखपत्र द्यावे, अतिक्रमण झालेल्या कुंभारी खाणी हस्तांतरीत कराव्यात, विटा, मुर्ती, कवेलु, मडकी विक्रीसाठी ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका हददीत मॉलमध्ये जागा द्यावी, या मागण्या आहेत.

मालाच्या उत्पादनासाठी शासकीय जागा मिळावी, ६० वर्षावरील कारागिरास मानधन सुरू करावे, विद्यार्थ्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र वसतीगृह उभारावे, धारावी कुंभार वाड्याला निवासी क्षेत्र जाहिर करून तेथील उद्योगाला एमआयडीसी क्षेत्रात स्वतंत्र जागा द्यावी, चंद्रपुर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळसह वनपरिक्षेत्र जिल्ह्यातील कुंभार समाजाला अत्यल्प दरात जळाऊ लाकुड उपलब्ध करून द्यावे, कारागिरांना व्यवसायासाठी अद्यावत उपकरणे, साधने चाक, पेंटींग मशीन, माती मळण्याचे यंत्र, आधुनिक भटटी व कच्चामाल अनुदान तत्वावर उपलब्ध करून द्यावे, आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे. या निवेदनावर दत्तोबा जोर्वेकर, गणेश जोर्वेकर, दिलीप म्हस्के, बाळासाहेब जाधव, सुभाष जोर्वेकर, दत्तु इश्वरे, कृष्णा उपाध्ये, सागर टिळेकर, मच्छिंद्र इश्वरे, ज्ञानेश्वर वाकचौरे, संजय जोर्वेकर आदिंच्या सह्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...