आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती:परंपरा झुगारून वैद्यकीय महाविद्यालयांना देहदान करा; समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे जिजामाता विद्यालयात आवाहन

कुकाणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यापेक्षा शरीररचना शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कामी येण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांना मृतदेहांचे देहदान करून यासंबंधीच्या रुढी परंपरांना फाटा द्यावा, असे आवाहन समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज चिंचोलीकर (अकोट) यांनी केले.नेवासे तालुक्यातील भेंडे येथील जिजामाता विद्यालयाच्या आवारात लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गणेशत्सवानिमित्त आयोजित प्रबोधनपर कार्यक्रमात ते बोलत होते. देव केवळ मंदिरातच नव्हे, तर तो माणसातही असतो. लोकनेते कारखाना व शिक्षण संस्था उभी करणारे लोकनेते मारुतराव घुले पाटील हे देवमाणूसच आहेत.

कोणी मृत्यू पावले की त्याच्या अंगावरील जुने कपडे जाळून टाकतात. परंतु नावावरील सातबारा, सोने-नाणे मात्र जाळीत नाहीत, यावरून त्यांना आपला मृतदेह सोडून जमा करून ठेवलेले बाकी सर्वकाही लागते हेच सिद्ध होते. संत गाडगेबाबा कोणत्याच शाळेत गेले नाहीत. परंतु त्यांनी समाजाला लोकशिक्षण दिले. त्यामुळे त्यांचे नावाने आज विद्यापीठ आहे. देवा-धर्माच्या नावावर जाती-जातीत भांडणे लावण्याचा उद्योग सुरू आहे, असे सत्यपाल महाराजांनी सांगितले. निसर्गाने दिलेली हवा, पाणी, सूर्य, झाडाची सावली श्रीमंत-गरीब, जाती-धर्माचा भेदभाव करीत नाही. केवळ वर्षातून एकदाच वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्याऐवजी ऑक्सिजन मिळावा यासाठी वडाचे झाड लावा. देवाचे काम करा आणि झाडे लावा-झाडे जगवा. पाणी आडवा पाणी जिरवा, मातीचे जतन करा, जल पुनर्भरण करा, असे आवाहन ही सत्यपाल महाराज यांनी केले. यावेळी नागेबाबा परिवाराचे अध्यक्ष कडूभाऊ काळे, सांस्कृतिक मंडळ उपाध्यक्ष रवींद्र मोटे, कामगार संचालक सुखदेव फुलारी, प्रशासकीय अधिकारी कारभारी गायके, प्राचार्य भारत वाबळे, डॉ. जयश्री पवार आदी उपस्थित होते. सुखदेव फुलारी यांनी सत्यपाल महाराजांचा परिचय करून दिला.

बातम्या आणखी आहेत...