आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवारीची पहिली मागणी:पदवीधरसाठी भाजपकडे उमेदवारीची मागणी

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपकडून उमेदवारीची पहिली मागणी नगरमधून झाली आहे. नगर महापालिकेचे माजी नगरसेवक अ‍ॅड. धनंजय कृष्णा जाधव यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, जाधव हे काँग्रेसचे माजी नगरसेवक असले, तरी ते सध्या खासदार सुजय विखे यांचे निकटवर्तीय म्हणून परिचित आहेत.

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येत्या ३० जानेवारीला होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास उद्यापासून (५ जानेवारी) सुरुवात होणार आहे. या मतदार संघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. भाजपकडून महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे यांच्या उमेदवारीची चर्चा होती. मात्र, आता अ‍ॅड. धनंजय जाधव यांनी भाजपकडून उमेदवारीची मागणी केली आहे. जाधव हे खा. डॉ. सुजय विखे यांचे निकटवर्तीय आहेत. शहरात राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. या दोघांच्या सल्ल्यानेच जाधव यांनी उमेदवारीची मागणी केल्याचा दावा केला जात आहे.

दरम्यान, अ‍ॅड. धनंजय जाधव हे काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. त्यांच्या पत्नी सुप्रिया जाधव या काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका व मनपात काँग्रेसच्या गटनेत्या आहेत. जाधव कुटुंबीय सुमारे ५० वर्षांपासून नगरच्या राजकारणात सक्रीय आहेत. स्वतः धनंजय जाधव हे एकेकाळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय होते. पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या यापूर्वीच्या निवडणुकांमध्येही ते सक्रिय होते. मात्र, मागील काही वर्षांपासून ते विखेंच्य गटात कार्यरत आहेत. विखेंच्या भाजप प्रवेशापासून ते भाजपात सक्रीय झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी पदवीधर मतदार संघातून उमेदवारीची तयारी करत मतदार नोंदणीसाठी यंत्रणाही राबवली आहे. दरम्यान भाजपकडून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे बंधू राजेंद्र विखे यांच्या उमेदवारीची चर्चा असतानाच त्यांचे धनंजय जाधव यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात उमेदवारीबाबत भाजपकडून निर्णय होणे अपेक्षित असल्याचे सांगितले जाते.

बातम्या आणखी आहेत...