आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फळपीक विमा योजना:शेतकऱ्यांनी मृग बहार हवामान विमा योजनेत सहभागी व्हावे; कृषी विभागाचे आवाहन

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान होते. त्यामुळे फळबागांना विमा संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक योजना मृगबहार 2022-23 राबवण्यात आली आहे. या योजनेत पेरू, चिकू, संत्रा, मोसंबी, डाळिंब, लिंबू, आंबा, काजू व सीताफळ या फळबागधारक शेतकऱ्यांना आपल्या बागेचा विमा उतरवता येणार आहे.

फळबागांना विम्याचे कवच

अहमदनगर जिल्ह्यात सुमारे 76 हजार हेक्टरवर विविध फळबागा आहेत. कमी पाऊस, पावसाचा खंड, जास्त तापमान, जास्त पाऊस, आद्रता व किमान तापमान आदी विविध कारणामुळे फळबागांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे या फळबागांना विम्याचे कवच देणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृगबहार राबवण्यात येत आहे.

संरक्षण लागू राहणार

या योजनेत केंद्र शासनाने तीस टक्के विमा हप्ता स्वीकारला. अतिरिक्त 5 टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्वीकारले. उर्वरीत विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांना भरावयाचा आहे. एका शेतकऱ्यास चार हेक्टरपर्यंत विमा नोंदणी करता येईल. केवळ उत्पादनक्षम फळबागांना विम्याचे संरक्षण लागू राहणार आहे.

डाळिंब पिकासाठी प्रतिहेक्टरी विमा संरक्षित रक्कम 1 लाख 30 हजार रुपये असून शेतकऱ्यांना भरावयाचा विमा हप्ता 6500 रुपये आहे. विमा भरण्याची अंतिम मुदत 14 जुलै 2022 आहे. मोसंबीसाठी विमा संरक्षण 80 हजार रुपये, शेतकऱ्यांना विमा हप्ता 4 हजार रुपये, तर विमा भरण्याची मुदत 30 जून 2022 आहे.

विमा भरण्याच्या तारखा

  • पेरू पिकासाठी संरक्षित रक्कम 60 हजार रुपये, विमा हप्ता 3 हजार रुपये, हप्ता भरण्याची अंतिम तारीख 14 जून 2022 आहे. संत्रा पिकासाठी विमा संरक्षण 80 हजार रुपये, विमा हप्ता 4 हजार रुपये, तर विमा भरण्याची अंतिम मुदत 14 जून 2022 आहे.
  • चिकू पिकासाठी विम्याचे कवच 60 हजार रुपये, विमा हप्ता 3 हजार रुपये, तर हप्ता भरण्याची अंतिम तारीख 30 जून 2022 आहे.
  • लिंबू पिकासाठी विमा संरक्षण 70 हजार रुपये, विमा हप्ता 3500 रुपये, तर विमा भरण्याची अंतिम तारीख 14 जून 2022 आहे.
  • सीताफळ पिकासाठी प्रतिहेक्‍टरी विमा संरक्षण 55 हजार रुपये, विमा हप्ता 2750 रुपये, तर विमा भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे.

विम्याचे संरक्षण द्यावे

मृगबहार फळ पीक विमा योजनेसाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही कंपनी नियुक्त आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या फळबागांचा विमा उतरावा. त्यासाठी कृषी कार्यालयाशी अथवा गावातील कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्यासह नजीकच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...