आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोयाबीन पेरणीआधी प्रात्यक्षिक करा, चांगले बियाणे वापरा:कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन; कृषी आयुक्तांनी काढले परिपत्रक

अहमदनगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरीप हंगाम 2022 साठी सोयाबीनच्या पेरणीसाठी स्वतःकडे उपलब्ध असलेले चांगले बियाणे वापरावे, पेरणीपूर्व बीजप्रक्रीया करावी, असे आवाहन कृषी आयुक्तांनी केले आहे. खरीप हंगामासाठी सोयाबीन पेरणी करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत राज्याच्या कृषी विभागानेही शेतकऱ्यांना जाहीर आवाहन केले आहे.

याबाबतचे परिपत्रक कृषी आयुक्तांनी प्रसिद्धीस दिले. बियाण्याच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने हे आवाहन केल्याचे दिसून येत आहे. पेरणीसाठी स्वतःकडे उपलब्ध असलेले चांगले बियाणे पेरणीसाठी वापरा. पेरणीपूर्व बीजप्रक्रीया करावी अशा सूचना दिल्या आहेत.

शेतकऱ्यांनो हे करा

  • चांगली ओल म्हणजे 75 ते 100 मि. मि. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी.
  • 3 ते 4 सेंटीमीटर खोलीपर्यंत पेरणी करावी.
  • प्रति हेक्टरी बियाणे दर 75 किलोवरून 50 ते 55 किलोवर आणण्यासाठी टोकण पद्धतीने किंवा प्लॅटरद्वारे पेरणी करावी.
  • सोयाबीनची उगवणक्षमता 70 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास उगवण क्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे.
  • पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी.
  • रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी 3 तास अगोदर बीजप्रक्रिया करावी.
  • बियाणे सावलीत वाळवावे व नंतर त्याची पेरणी करावी.
  • बियाण्याची पेरणी 3 ते 4 सेंटीमीटर खोलीपर्यंत करावे

शेतकऱ्यांनो आधी प्रात्यक्षिक करा

आगामी खरीप हंगामात अहमदनगर जिल्ह्यात 6 लाख 68 हजार 535 हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी होईल. यामध्ये सोयाबीनची 1 लाख 24 हजार 804 हेक्टरवर पेरणी होईल. शेतकऱ्यांनी आपल्या जवळील चांगल्या सोयाबीन बियाण्याची पेरणी करावी. शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिक करून 100 पैकी 70 दाणे उगवले, तर बियाणे वापरता येते. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...