आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्री:तुळजाभवानीच्या पलंगाचे तुळजापूरकडे प्रस्थान

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहरात तीन दिवस मुक्कामी असलेल्या तुळजाभवानीच्या पलंगाने तुळजापूरकडे प्रस्थान ठेवले आहे. पलंगाचे भुईकोट किल्ला येथे आगमन झाल्यावर बन्सी महाराज जोशी परिवारातर्फे पूजा व महाआरती करण्यात आली. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी, ही वर्षभरात २१ दिवस निद्रा घेते तर उरलेले ३४४ दिवस देवी अष्टौप्रहर जागृत असते. त्यासाठी अहमदनगरच्या पलंग व पालखीला येथे मान असतो. निद्रा समयी देवीला १०८ साड्यांचे दंड नेसवले जाते.

त्यानंतर अहमदनगरमधून आलेल्या पलंगावर निद्रेकरिता ठेवले जाते, अशी माहिती तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे मुख्य मानकरी व नगर शहरातील सबजेल चौकातील तुळजाभवानी मंदिराचे पुजारी नगरचे गणेश पलंगे यांनी दिली.देवीची मंचकी निद्रा २१ दिवसात विभागलेली आहे, मंचक याचा अर्थ पलंग असा आहे. देवी भवानीची निद्रा तीन प्रकारात विभागली असून, त्यात श्रम निद्रा ही अहमदनगरच्या पलंगावर होते, घोर निद्रेतुन जागी होऊन देवीने नऊ दिवस आसुरांसोबत युध्द केले. नवव्या दिवशी असूर शरण आले, देवीच्या चरणी स्थान मागून देवतांची माफी मागितली.

यावेळी नऊदिवस युध्दामुळे देवीला थकवा आल्याने शारदीय नवरात्रानंतर पाच दिवसाची निद्रा घेते यालाच श्रमनिद्रा असे म्हणतात. या निद्रेसाठी तुळजाभवानीचे माहेर अहमदनगरहून पलंगे घराण्याचा पलंग येतो, त्यावर आईसाहेब निद्रा घेतात या निद्रेस मंचकी निद्रा म्हणतात, असेही पलंगे यांनी सांगितले. शाकंभरी पौष नवरात्री दरम्यान देवी ८ दिवस चांदीच्या मंचकावर निद्रा घेते, अवघ्या विश्वाचा भार सोसुन विसावा घेण्यासाठी आई गादीवर असते म्हणुन तमाम देवी भक्त तथा देवीचे आराधी देवी मातेश्वरीच्या या निद्राकालात गादी, उशी, तक्क्या यांचा त्याग करून उपवास धरतात, असेही त्यांनी सांगितले.

जोशी यांच्या येथून पलंग निघाल्यानंतर सायंकाळी भिंगार येथे पलंग व पालखीची भेट झाली. पुढे दसऱ्याला मानाची पलंग, पालखी तुळजापूर शहरातील शुक्रवार पेठ भागात दाखल होईल. तेथून मध्यरात्री मिरवणुकीने त्यांचे प्रस्थान होणार आहे व पलंग, पालखी मंदिरात पहाटे दाखल होईल, अशी माहिती पलंगे यांनी दिली आहे.नगरमध्ये नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. नऊ दिवस शहर व उपनगरातील देवीच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले हाेते.

बातम्या आणखी आहेत...