आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारांचे धाबे दणाणले:नगरमधील सराईत गुन्हेगारांच्या दोन टोळ्या जिल्ह्यातून हद्दपार; पोलिस अधीक्षकांचा दणका

अहमदनगर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या दोन टोळ्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केले. यामध्ये 9 सराईत आरोपींचा समावेश आहे. याबाबतचे आदेश अधीक्षक पाटील यांनी काढले आहे.

श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात 16 गुन्हे दाखल असलेल्या दाभाडे टोळीला 15 महिन्यांकरीता अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये टोळीप्रमुख अर्जुन खुशाल दाभाडे, टोळीसदस्य उद्देश अशोक मंडलिक, सागर विजय धुमाळ, विकी बबन ढमके, विजय भास्कर हातांगळे ऊर्फ घोगर, नमोद ऊर्फ नम्या अरूण कांबळे, मंगेश साहेबराव साळवे (सर्व रा. गोंधवणी, वार्ड नंबर एक, श्रीरामपूर) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरूध्द घातक शस्त्र बाळगून किरकोळ कारणावरून लोकांना धमकावणे, मारहाण, दुखापत करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, अनाधिकाराने घरात प्रवेश करणे, गैरकायद्याची मंडळी जमवुन शिवीगाळ करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, दरोड्याची तयारी करणे, चोरी करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, हद्दपार आदेशाचा भंग करणे असे 16 गुन्हे दाखल आहेत.

पप्पु ऊर्फ राहुल बाळासाहेब कदम (वय 28 रा. कदमवस्ती, परिटवाडी ता. कर्जत) व शक्ती ऊर्फ विशाल अशोक अडसुळ (वय 27 रा. राशिन ता. कर्जत) यांना अहमदनगर जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले आहे. त्यांच्याविरुध्द घातक हत्यारासह दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, लोखंडी रॉड, तलवारने हल्ला करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, गैरकायद्याची मंडळी जमवुन मारहाण करणे, अत्यंत किरकोळ कारणावरून मारहाण करणे, असे पाच गुन्हे कर्जत पोलीिस ठाण्यात दाखल आहेत.

टोळी करुन परिसरात दहशत निर्माण करणार्‍या टोळीविरुध्द हद्दपारीची कारवाई करून अधीक्षक पाटील यांनी सराईत गुन्हेगारांना दणका दिला आहे. वारंवार गुन्हे करणार्‍या सराईत गुन्हेगारांना हद्दपार केल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

बातम्या आणखी आहेत...