आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे पाॅझिटिव्ह:अपंगत्वाला ‘वरदान’ ठरवत दीपालीने चित्रकलेत निर्माण केली स्वतंत्र ओळख, अपघातानंतर चार महिने होती ‘वॉटरबेड’वर

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 22 वर्षांपूर्वी रस्ता अपघातात मणक्याला मार लागल्याने आले कायमचे अपंगत्व

नगर शहरातील गुलमोहोर रोडवरील दीपाली माणकापुरे वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत सामान्य मुलींप्रमाणे मुक्तपणे बागडत होती. मात्र मे १९९९ मध्ये झालेल्या एका रस्ता अपघातात तिला अपंगत्व आले. अपघातानंतर ती चार महिने ‘वॉटरबेड’वर झोपून होती. या अपघातातून सावरण्यासाठी तिने चित्रकला, रांगोळीचा आधार घेतला. चित्रे, रांगोळी काढायला सुरुवात केल्याने तिचा आत्मविश्वास वाढला. अपंगत्वाला ‘वरदान’ ठरवत दीपालीने चित्रकला आणि रांगोळीत स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली.

मे १९९९ मध्ये आई-वडिलांसाेबत कारने प्रवास करताना सांगली जिल्ह्यात अपघात झाला. या अपघातात दीपाली यांनी आई वडील गमावले. तर दीपालीच्या मणक्याला मार लागल्याने पाय अधू झाले. यातून सावरत दीपालीने मग चित्रकलेत मन रमवायला सुरुवात केली. त्यासाठी कॉलनीतच चित्रकलेची शिकवणी लावली, इंटरनेटवर वेगळे चित्र पाहून, ती वर्तमान पत्रात येणारे चित्र पाहून चित्र, रांगाेळी तसेच स्केच काढू लागली. ड्रॉईंग पेपर, कॅनव्हासवर काढलेले चित्र रंगवू लागल्या. त्यामुळे तिची चित्रकलाही बहरत गेली. जास्त वेळ बसू शकत नसल्याने दीपालीला चित्रे काढण्यासाठी वेळ लागतो, पण चिकाटीने ती चित्र पूर्णत्वाला नेते. तहान भूक हरपून ती चित्रात जीव ओतते. दीपाली संग्रहात आज विविध चित्रे आहेत. वेगवेगवळ्या छटा दीपालीच्या चित्रकलेत दिसून येतात. त्या चित्रांमधील रंगांच्या छटा वेगळीच अनुभूती देतात. ही चित्रे काढणारी दीपाली पायाने ‘अधू’ आहे हे सांगूनही पटणार नाही. अपघाताने आलेले अपंगत्व हा शाप आहे असे कुणी मानते. पण दीपालीने त्यालाच ‘वरदान’ ठरवत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. दीपालीची ही जिद्द आणि धडपड आजच्या स्पर्धेच्या जगात निराशेने, मनाने ‘अपंग’ झालेल्यांसाठी संजीवनी ठरणारी प्रेरणा आहे. यासोबतच दीपाली स्वत:ची सर्व कामे स्वत:च करते.

संकटे चहूबाजूने येतात मात्र अशा परिस्थितीत डगमगून न जाता परिस्थितीला धैर्याने सामोरे जायचे असते. हे दीपाली माणकापुरे यांनी आपल्या कृतीतून हे सिद्ध करून दाखवले. अपंगत्वासमोर हार न मानता जिद्दीने कार्य करत राहण्याचा सल्लाही ती देते. प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक विचार करण्याची, जबाबदारी स्वीकारण्याची क्षमता यामुळे दीपालीची ही सकारात्मक ऊर्जा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

वाइटातुनही जीवनाकडे चांगले पाहायला शिका
चित्रकला आिण रांगोळी काढणे ही माझी आवड आहे. अपंगत्व आल्यानंतर आजी-आजोबा, भाऊ, मामा मामी, बहीण, नातेवाईक व मित्र मैत्रिणींची साथ आणि आधार यामुळे मी आज इथवर आले. अपंगत्व आले म्हणजे आयुष्य संपले, असे नाही. वाईटातूनही चांगले पाहायला शिका. जीवनाकडे सकारात्मकतेने बघा. आपण केलेल्या चांगल्या गोष्टी आयुष्यात कामी येतात.'' दीपाली माणकापुरे.

बातम्या आणखी आहेत...