आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्घटना:अपंगत्व असतानाही शेळ्यांना वाचवण्यास गेलेल्या आदिवासी महिलेचा अकोलेत बिबट्याने घेतला बळी

अकोले4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अपंगत्व असतानाही बिबट्यापासून शेळ्यांना वाचवण्यासाठी धावणाऱ्या ६५ वर्षीय आदिवासी महिला बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली. ही दुर्घटना अकोले तालुक्यातील निळवंडे धरण परिसरात गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेत महिलेला बिबट्याने राहत्या घरापासून जबड्यात पकडून सुमारे ३०० ते ४०० फूट अंतरापर्यंत फरपटत ओढत नेले. तुळसाबाई तथा रखमाबाई तुकाराम खडके (वय ६५, रा. निळवंडे (कोकणेवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे.

मृत महिला तुळसाबाई खडके (वय ६५) निळवंडे प्रकल्पग्रस्त म्हणून गावच्या कोकणेवाडी शिवारात शेती व शेळ्या पाळून उदरनिर्वाह करते. त्यांना निळवंडे गावच्या कोकणेवाडी शिवारातच सर्व्ह नंबर ३४ मध्ये प्रकल्पग्रस्त म्हणून जंगलात जमीन मिळाली होती. या महिलेचे घरही जंगलातच आहे. घराशेजारीच महिला आपल्याच पाळीव शेळया बांधून ठेवते. पहाटे चार वाजेच्या दरम्यान बिबट्याने हा हल्ला केला. शेळ्या ओरडू लागल्यावर ही वृध्द महिला जागी झाली.

ती घराबाहेर गोठ्यात येईपर्यंत बिबट्याने एक शेळी ठार केली. अपंगत्व असतानादेखील शेळ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करू लागली. मात्र महिलेच्या प्रतिकाराने आणखी आक्रमक होत बाबट्याने वृध्देवरच हल्ला केला. या महिलेस तेथून जवळच असलेल्या जंगलात सुमारे ४०० फूट अंतरापर्यंत फरपटत ओढत नेले.या दुर्घटनेत महिला ठार झाली.

या घटनेनंतर स्थानिकांकडून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली. स्थानिक पातळीवर पंचनामा करून मृतदेह झोळीकरून हमरस्त्यावर आणण्यात आला. गुरूवारी सकाळनंतर अकोले ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. या वृध्देच्या मानेजवळ मोठी जखम होती. एक पाय व छातीचा भाग बिबट्याने तोडला आहे.

पहाटे वृध्देचा आेरडण्याचा आवाज ऐकला पण वस्ती एकटीच होती. त्यामुळेच मदतीसाठी रात्रीच्या काळोखात शेजारी जवळपासचे लोक जाणार तरी कुठे ? म्हणून पहाटेनंतर वृध्देचा शोध घेण्यात आला. मात्र शोध घेईपर्यंत बराच उशीर झाला होता. बिबट्याच्या हल्ल्यात ती ठार झाली होती. या वृध्देचा भाचा सुभाष विठ्ठल खडके, दगडू ठका पारधी यांना घटनेबाबत कळवण्यात आले.

ओट्यावर बसलेला छोटा मुलगा सुदैवाने बचावला
प्रवरा नदी तीरावरील निळवंडे गावात चार दिवसांपासून रात्री ९ वाजताच बिबट्याचा वावर लोक पहात आहेत. बिबट्याने हल्ला करून सत्यवान गायकवाड याच्या ओट्यावरून मांजर उचलून नेली. या ओट्यावर मांजरी शेजारीच छोटा मुलगा बसला होता, त्याच्या सुदैवानेच तो बचावला. यादरम्यान गायकवाड यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्या तेथून पसार झाला.

बिबट्याची मोठी दहशत निळवंडे, कोकणेवाडी व निंबळ परिसरातून आहे. बिबट्याच्या हरकतीमुळे परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिक भयभित झाले आहेत. वनविभागाने या नरभक्षक बिबट्यास पिंजरा लावून जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...