आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनागोंदी:तब्बल अडीच हजार भूखंड असतानाही महापालिकेकडून जागा खरेदीचा सपाटा

मयूर मेहता2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या तब्बल २४४१ जागा व भूखंड आहेत. त्यापैकी ५२ टक्के जागांवर अद्यापही महापालिकेचे नाव लागले नसल्याने ते बेवारस अवस्थेत आहेत. विकास योजनेच्या आराखड्यानुसार शहरात ३१६ आरक्षणे असून त्यापैकी ८० टक्के आरक्षणे अद्यापही विकसित झालेली नाहीत. असे असतानाही याकडे दुर्लक्ष करत गेल्या दोन-तीन वर्षांपासून महापालिकेने जागा खरेदी करण्याचा सपाटा लावण्याचे चित्र आहे.

शहरात सध्या स्मशानभूमी व दफनभूमीसाठी नव्याने आरक्षण प्रस्तावित करून ३२ कोटी रुपयांना ती जागा खरेदी करण्याचा घाट घातला आहे. त्यावरून सध्या राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आजमितीला महापालिकेकडे २४४१ खुल्या जागा आहेत. त्यातील १८०६ मंजूर रेखांकनातील आहेत. तर इतर जागा सार्वजनिक वापराच्या आहेत. त्यातील ३१६ जागांवर आरक्षण आहेत. त्यापैकी ८० टक्के जागा अद्यापही विकसित नाहीत. ११७४ जागांवर मनपाचे नाव लागले आहे. तर १२६७ जागांवर अद्यापही नाव लागलेले नाही.

असे मोकळे भूखंड बळकावण्याचे प्रकार वाढले आहेत. तर आरक्षणे असलेल्या जागा विकसित न करता मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागा आरक्षण मुक्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेने आरक्षित जागा विकसित करण्याऐवजी नव्याने आरक्षणे प्रस्तावित करून त्या जागा खरेदी करण्याचा घाट घातला आहे. मागील काही वर्षात अशा अनेक जागा मनपाने कोट्यवधी रुपये खर्चून संपादित केल्याचे समोर आले आहे. नवीन जागा खरेदीपेक्षा मनपाने आरक्षित भूखंड विकसित करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

नागरी सुविधांची आरक्षणे दुर्लक्षित शहरात नागरिकांना सुविधा मिळाव्यात, यासाठी विकास योजनेच्या आराखड्यात ३१६ आरक्षणे मंजूर आहेत. यातील उद्याने, खेळाची मैदाने, स्मशानभूमी, व्यापारी संकुले आदी महत्त्वाची आरक्षणे असलेल्या जागा विकसित करण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. आरक्षित जागा मुदतीत संपादित न केल्याने दोन आरक्षणे व्यपगत झाल्याचेही समोर आले आहे.

टीडीआरमध्ये घेतल्या १५६ जागा माहापालिकेने टीडीआरमध्ये १५६ जागा संपादित केल्या आहेत. यातील ११३ जागा मनपाच्या नावावर आहेत. मात्र, ४३ जागांना अद्यापही मनपाचे नाव लागलेले नाही. विशेष म्हणजे यातील बहुतांशी जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. टीडीआरमध्ये घेतलेल्या जागांमध्ये आरक्षित जागांचे प्रमाण कमी असल्याचे दिसते.

बातम्या आणखी आहेत...