आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामांतर केल्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. त्यामुळे शहराची शांतता बाधित होत असून हे आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
तसेच, कुणी कितीही आंदोलने केले तरी छत्रपती संभाजी महाराज यांचाच उदोउदो होईल. औरंगजेबाचा उदोउदो कधीही होणार नाही. आंदोलकांनी हे ध्यानात घ्यावे, असेही देवेंद्र फडणवीसांनी सुनावले आहे. देवेंद्र फडणवीस हे अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
उद्योजकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
नामांतरविरोधी आंदोलनामुळे शहरात अशांतता निर्माण होत आहे. या अशांततेचा परिणाम व्यापार, उद्योग, पर्यटनावर होत आहे. हे थांबवण्यासाठी सर्व विचारधारांच्या प्रमुखांना एकत्र बोलावून सामंजस्याने विषय मार्गी लावून शांतता अबाधित राखावी, असे साकडे शहरातील उद्योजक, व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका पत्राद्वारे घातले आहे. त्यावर देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती संभाजीनगरमध्ये शांतता रहायला हवी. नामांतराचा निर्णय एका संवैधानिक प्रक्रियेतून घेण्यात आला आहे. हा निर्णय सर्वांनी मान्य करायला हवा.
जलयुक्त शिवार योजनेत राजकारण
दरम्यान, अहमदनगरमधील एका कार्यक्रमात मविआने जलयुक्त शिवार योजनेत राजकारण केले, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यात 37 लाख हेक्टर सिंचनाखाली आले. मात्र, नंतर राजकारणामुळे ही योजना बंद झाली. आता आम्ही जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू केली आहे. पाण्याचा थेंब न थेंब अडवून जलसंधारण करण्यात येणार आहे. याचा लाभ शेतकऱ्यांनाच होईल, असे फडणवीस म्हणाले.
संबंधित वृत्त
छत्रपती संभाजीनगर नामांतर वादामुळे उद्योग, पर्यटनावर परिणाम:शहरातील शांतता अबाधित ठेवा; उद्याेजकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
शहराच्या नामांतरावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय पुढाऱ्यांकडून परस्परविरोधी वक्तव्ये सुरू आहेत. ती सर्वसामान्य जनतेत अस्वस्थता निर्माण करत आहेत. आता कोणत्याही प्रकारची अशांतता कुणालाच परवडणारी नाही. या अशांततेचा परिणाम व्यापार, उद्योग, पर्यटन व क्रमाने सामान्यांवर होईल. त्यामुळे आपण शहरातील अनिश्चिततेला विराम देण्यासाठी सर्व विचारधारांच्या प्रमुखांना एकत्र बोलावून सामंजस्याने विषय मार्गी लावून शांतता अबाधित राखावी, असे साकडे शहरातील उद्योजक, व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका पत्राद्वारे घातले आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.