आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घणाघात:'मविआ'त खुर्चीवर बसण्यावरून वाद, त्यांनी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच केले; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

अहमदनगर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडीमध्ये खुर्चीवर बसवण्यावरून वाद सुरू आहेत. त्यांनी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच केले. आता तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीवर नाराज होऊ नका. वाद करायचे नाहीत. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातून 42 पेक्षा जास्त लोकसभेच्या जागा निवडून आणण्यासाठी तयारीला लागा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (26 मे) केले.

अहमदनगर येथे आयोजित भाजपच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार राम शिंदे,आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, भाजपचे प्रदेश चिटणीस तथा दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे उपस्थित होते.

आघाडीत वाद सुरू

फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीत सध्या खुर्चीवर बसण्यावरून वाद सुरू आहेत. ते कधीच एकत्र राहू शकत नाहीत सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच त्यांनी केले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी एक वर्ष पक्षासाठी द्यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार पुन्हा आल्यानंतर भारत पुढचे अनेक वर्ष कधीच मागे वळून पाहणार नाही.

कार्यकर्त्यांनी सेतू व्हावे

फडणवीस पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने भाजप - शिवसेनेचे सरकार आले आहे. आपल्या सरकारला यशस्वी करण्याचे काम तुमच्या हाती आहे. सेतू होऊन कार्यकर्त्यांनी काम करावे सामान्य माणसांच्या योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात असे आवाहन त्यांनी केले.

चिंता करू नका

देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले की, साहेब चिंता करू नका. रामभाऊ तुम्हीही देखील चिंता करू नका. आजही आणि उद्याही जबाबदारी माझीच आहे. पक्ष विचाराबाहेर काम होणार नाही. आपण जी जबाबदारी देणार ती आम्ही घेणार असे विखे यांनी सांगितले.

फडणवीसांनी लक्ष घालावे

जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीवरून आमदार राम शिंदे व खासदार डॉ.सुजय विखे यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राम शिंदे यांनी भाषणात जिल्ह्यात तुम्हाला लक्ष घालावे लागेल, तशी आमची सर्वांची इच्छा आहे, असे फडणवीस यांना सांगितले. जिल्ह्यात सुसंवाद झाला पाहिजे, त्यासाठी संघटनात्मक बांधणी करावी लागेल, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.