आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिर्डी:भाविकांना ‘साई ब्लेसिंग’द्वारे घरबसल्या मिळेल कृपाप्रसाद, पंतप्रधानांसह मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांना पाठवल्या शुभेच्छा

शिर्डी22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आत्मनिर्भर भारताच्या उभारणीला हातभार - डॉ. सुजय विखे, खासदार

कोरोना महामारीच्या संकटातून सावरण्यासाठी जगभरातील भाविकांना लढण्यासाठी आत्मिक बळ मिळावे, नवऊर्जा प्राप्त व्हावी, मन:शांती मिळावी यासाठी साईबाबांच्या नगरीतून साई ब्लेसिंग बाॅक्सचे दिवाळीनिमित्त गिफ्ट तयार करण्यात आले असून त्यातून भक्तीचा सुगंध जगभरात दरवळणार आहे. शुभारंभापूर्वी या बॉक्सची साई प्रतिमेसह पालखीतून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह देशभरातील सर्व खासदार व राज्यातील सर्व आमदारांना विखे पाटील परिवाराच्या वतीने हे बॉक्स भेट म्हणून पाठविण्यात आले आहेत. शिर्डीत या बॉक्सच्या शुभारंभप्रसंगी प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, नगराध्यक्षा अर्चना कोते, ज्येष्ठ नगरसेवक अभय शेळके सर्व नगरसेवकांसह उपस्थित होते. येथील प्रसिद्ध चित्रकार हेमंत वाणी यांच्या संकल्पनेतून हे बॉक्स साकारले आहेत. यामध्ये वाणी यांनी चितारलेले साईचे कृपादृष्टी असलेले डोळे, शालिनी विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील बचतगटाने साई मंदिरातील फुलांपासून बनवलेली सुगंधी अगरबत्ती, गाईच्या शेणापासून बनवलेला धूप, झेंडूपासून बनवलेला अष्टगंध, सब्जाच्या फुलांपासून बनवलेली मेणबत्ती अशा नऊ वस्तूंचा समावेश आहे. याशिवाय यात ज्याला हा बॉक्स पाठविण्यात येणार आहे त्यांच्या नावे साई संस्थानची अन्नदानाची ५१ रुपयांची देणगी पावती, बाबांची उदी, प्रसाद असेल. वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अ‍ॅपच्या माध्यमातून जगभरात कुठेही व कुणालाही हे बॉक्स पंधराशे रुपये रक्कम भरून पाठवता येतील.

आत्मनिर्भर भारताच्या उभारणीला हातभार
साई ब्लेसिंग बॉक्स बाबांच्या प्रचार-प्रसाराबरोबरच पंतप्रधानांच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारताच्या उभारणीलाही हातभार लावणारे ठरतील. यामुळे आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. - डॉ. सुजय विखे, खासदार