आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पारनेर:आंदोलन करणारे शेतकरी पाकिस्तानातून आलेत का? अण्णा हजारे यांचा सवाल, शेतकरी आंदोलकांना पाठिंबा जाहीर

पारनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आंदोलन करणारे शेतकरी पाकिस्तानातून आलेत का?

कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांवर वारंवार आंदोलने करण्याची वेळ येते आहे. हे मोठे दुर्दैव आहे. आंदोलक शेतकरी पाकिस्तानातून आले आहेत का? ते आपल्या देशातीलच आहेत. एकत्र बसून त्यांच्या प्रश्नावर तोडगा काढला पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

केंद्र सरकारच्या विविध शेतीविषयक विधेयकांना विरोध करण्यासाठी पंजाब,हरियाणासह देशाच्या विविध भागातून आलेल्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. लाठीमार करण्यात येऊन पाण्याचे फवारेही शेतकऱ्यांच्या दिशने सोडण्यात आले. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी हजारे यांना विचारले असता त्यांनी आंदोलकांना पाठिंबा देत केंद्र सरकारला लक्ष्य केले.

निवडणुकीच्या काळात तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतावर, त्याच्या घरी मत मागण्यासाठी गेला. आता आंदोलन सुरू झाल्यानंतर सरकार व शेतकरी यांनी एकत्र बसून चर्चा का केली नाही? अद्याप शेतकऱ्यांचे आंदोलन शांततेत सुरू आहे. शेतकरी हिंसेसाठी मजबूर झाले तर त्यास जबाबदार कोण? शेतकरी हिंसा करणार नाहीत असा मला विश्वास आहे. असे सांगून अण्णा म्हणाले, शेतकऱ्यांच्या अंगावर पाण्याचे फवारे सोडण्यात आले. त्यात एक शेतकरी मृत्यूमुखी पडला. ही गोष्ट आपल्या देशासाठी अजिबात योग्य नाही.

देशातील शेतकरी दुश्मन आहेत का?
हजारे म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करा. त्यांचे मत काय आहे, त्यांच्या मागण्या काय आहेत हे तपासले पाहिजे. त्यानंतरच निर्णय घेतला पाहिजे. आज जी पद्धत अवलंबली जात आहे ती योग्य नाही. हा तर भारत-पाकिस्तानसारखा वाद झाला. देशातील शेतकरी दुश्मन आहेत का? सरकार व शेतकरी एकाच देशाचे लोक आहेत. कोणताही प्रश्न सोडवायचा असेल, तर एकत्र बसून निर्णय घेतला पाहिजे. चर्चेतून प्रश्न सुटतील असे मला वाटते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser