आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुळा सहकारी बँक लि. सोनई या संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी गोकुळ नांगरे यांनी घोषित केल्यानंतर बँकेचे संस्थापक आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते नवनिर्वाचित संचालकांचा सोमवारी सन्मान करण्यात आला. मुळा बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या मुदतीअखेर निवडून द्यावयाच्या जागे एव्हढेच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले.
यावेळी आमदार गडाख म्हणाले, तालुक्यातील शेतकरी व तरुणांना उद्योग व्यवसायासाठी सुलभ कर्ज पुरवठा व्हावा व ते आत्मनिर्भर व्हावेत यासाठी बँकेची स्थापना केली. परंतु ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था निसर्गावर अवलंबून असल्याने कर्जफेड घालून दिलेल्या मुदतीत होत नाही. त्यामुळे बँकेच्या वसुलीवर परिणाम होऊन थकबाकीचे प्रमाण वाढल्याचे सांगून नवीन संचालक मंडळाने वसुलीवरही अधिक लक्ष देण्याची गरज आहे. मुळा उद्योग समुहातील संस्था सभासदांप्रमाणे निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा कायम राखली आहे. यावेळी मुळा कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर, बँकेचे नवनिर्वाचित संचालक सिताराम झिने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बँकेच्या नवनिर्वाचीत संचालक मंडळ सदस्यात सर्वसाधारण मतदारसंघातून सिताराम हरिभाऊ झिने (हिंगोणी), भाऊसाहेब जगन्नाथ निमसे (सोनई), शिवाजी लक्ष्मण वाकचौरे (रांजणगावदेवी), एकनाथ मारुती जगताप (म.ल.हिवरा), रमेश राजाराम जंगले (पानेगाव), पंढरीनाथ विश्वनाथ मोरे (मोरयाचिंचोरे), माणिक शंकर होंडे (पाचुंदा), भानुदास सखाराम रेडे (नेवासा) यांची बिनविरोध निवड झाली आहे.
राखीव मतदार संघातून विश्वनाथ गंगाधर बनकर (सोनई), संजय विष्णू गर्जे (सोनई), उत्तम सुमंत शिरसाट (लोहोगाव) आणि राखीव महिला मतदार संघातून जयश्री जालिंदर येळवंडे (सोनई), पुष्पा रामभाऊ कराळे (कांगोणी) यांची बिनविरोध निवड झाली आहे. आमदार शंकरराव गडाख यांनी सन १९९७ मध्ये मुळा सहकारी बँकेची स्थापना केली. बँकेने हजारो गरजू शेतकरी व व्यावसायिकांना कर्ज पुरवठा केला आहे. तसेच तालुक्यातील अनेक सुशिक्षित तरुणांना छोटे-मोठे व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेने अर्थसहाय्य केले आहे. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वसंत भोर यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.