आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या दोन दिवसांपासून नगर शहर व परिसरात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गेल्या ४८ तासात नगर शहर परिसरात २५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच सीना नदी वाहती होऊन नदीपात्रालगत पूरस्थिती निर्माण झाली. विशेषत: शहराच्या कल्याण रोड, गुलमोहर रोड व पाईपलाईन रोड भागातील विविध वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. अनेक नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले होते. महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही हतबल झाल्याचे चित्र होते.
गुरुवारी रात्री ११ वाजल्यापासून पहाटे साडेचार वाजेपर्यंत झालेल्या पावसामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. सीना नदी वाहती झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. कल्याण रोड, वारुळाचा मारुती परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरले. सावेडी उपनगर परिसरातील गावडे मळा, सूर्यानगर, वैष्णवी कॉलनी, गुलमोहर रोड परिसरातील अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले. या भागातील बहुतांशी रस्ते शुक्रवारी दुपारपर्यंत पाण्याखाली होते. काही वसाहतींना पाण्याने वेढा दिल्याने नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले होते. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाची पथके पाणी काढण्यासाठी प्रयत्न करत होती. मात्र, सर्वच बाजूने पाणी साचल्याने यंत्रणाही हातबल झाल्याची स्थिती होती.
पूल पाण्याखाली; वाहून गेल्याची अफवा
नगर कल्याण महामार्गावरील सीना नदीवर असलेला पूल दोन वर्षानंतर पुन्हा पाण्याखाली गेला. त्यामुळे शुक्रवारी दुपारपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद होती. तसेच रेल्वे स्टेशन परिसरातील लोखंडी पुलालगत असलेल्या अमरधाम स्मशानभूमीमध्येही नदीच्या पुराचे पाणी शिरले होते. आयुक्त पंकज जावळे यांनी परिस्थितीचे पाणी करून उपाययोजनांच्या सूचना दिल्या. पुराच्या पाण्यामुळे नदीवरील पूल वाहून गेल्याची अफवा शहरात पसरली होती. त्यामुळे यंत्रणांचे धाबे दणाणले होते.
ओढ्यांमधील ॲनिमल वेस्ट घरासमोर
शहरातील बहुतांशी ऑडिओ नाल्यांमध्ये कत्तलखाने व हॉटेलमधील ॲनिमल वेस्ट आणून टाकले जाते महापालिकेकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष झाले नालेसफाई ही वरचेवर झाली. परिणामी, पावसामुळे ओढून आले तुडुंब भरून त्यातील पाणी रस्त्यावर राहण्यास सुरुवात झाली. राधाबाई काळे महिला विद्यालया जवळील रस्त्यावर नागरिकांच्या घरासमोर ॲनिमल वेस्टच्या गोण्या वाहून आल्या. त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली होती.
मनपाचे सहा पैकी चार पंप नादुरुस्त
पावसाळ्यात नागरिकांच्या घरात शिरलेले पाणी बाहेर काढण्यासाठी महापालिकेने सहा पंप घेतलेले आहेत चार प्रभाग समिती कार्यालयांच्या प्रभागाधिकाऱ्यांकडे हे पंप देण्यात आलेले आहेत अग्निशमन विभागाचे पथक नागरिकांच्या घरातील पाणी काढण्यासाठी गेले असता प्रभाग अधिकाऱ्यांकडे पंपाची मागणी करण्यात आली मात्र सहापैकी चार पंप बंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन फक्त काठावरच झाल्याचे स्पष्ट झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.