आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत 2015- 2016 मध्ये करण्यात आलेल्या कोंभळी व चांदे खुर्द (ता. कर्जत) येथील दोन कामात गैरव्यवहार झाल्याचे लाचलुचपत विभागाने केलेल्या खुल्या चौकशीत स्पष्ट झाले. त्यानंतर लाचलुचपत विभागाने शुक्रवारी वन विभागातील तत्कालीन पाच अधिकारी, कर्मचार्यांविरूध्द कर्जत पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून तिघांना अटक केली आहे. गैरव्यवहार उघड झालेले काम माजी जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या मतदार संघातील आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये तत्कालिन सहायक वनसंरक्षक (रोहयो व अतिक्रमण निर्मुलन) रमेश गोविंद गोलेकर (वय 63), वनपरिक्षेत्र अधिकारी शंकरराव वृषीकेत पाटील, वनरक्षक शेखर रमेश पाटोळे (वय 41), वनपाल पल्लवी सुरेश जगताप, वनरक्षक बलभीम राजाराम गांगर्डे यांचा समावेश आहे. यातील वनपरिक्षेत्र अधिकारी शंकरराव पाटील, वनरक्षक बलभीम गांगर्डे आणि वनरक्षक शेखर पाटोळे यांना अटक करण्यात आली आहे.
जलयुक्त शिवार अभियान महायुती सरकारच्या काळात राबविण्यात आले होते. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर याच जलयुक्त शिवार अभियानात गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले. तसेच या अभियानातील कामाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. नेमलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल दिल्यानंतर काही कामाची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी होती. त्यानुसार नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंभळी व चांदेखुर्द येथे केलेल्या खोल सलग समतल चराच्या कामाची लाचलुचपत विभागाच्या पथकाने 4 सप्टेंबर, 2021 पासून खुली चौकशी केली. या चौकशीत कोंभळी येथील कामात संगनमताने खोटे दस्त ऐवज तयार करून नऊ हजार 320 रूपयांचा तर चांदे खुर्द येथील 58 हजार 248 रूपयाचा गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाले.
गैरव्यवहार प्रकरणी पाच जणांवर गुन्हे दाखल
लाचलुचपत विभागाच्या चौकशी पथकाने वरिष्ठांना अहवाल दिल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार कोंभळी येथील कामाबाबत गोलेकर, पाटील, पाटोळे तर चांदेखुर्द येथील कामातील गैरव्यवहारबाबत गोलेकर, पाटील, जगताप, गांगर्डे अशा दोन्ही कामातील गैरव्यवहार प्रकरणी पाच जणांवर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक हरीष खेडकर, पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे, निरीक्षक विजय ठाकूर, अंमलदार संतोश शिंदे, विजय गुंगल, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, हरूण शेख व राहुल डोळसे यांच्या पथकाने तिघांना अटक केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.