आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंथन शिबिर:राष्ट्रवादी फुटीची चर्चा अन् पवार रुग्णालयातून शिर्डीत; अजितदादांसह कोल्हेंनी फिरवली पाठ

शिर्डीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिराला हजेरी लावून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच वेळी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या अनुपस्थितीने दोघे नाराज असल्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली. दुसरीकडे वेगवेगळ्या राजकीय पक्षांतील नेत्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार फुटणार असल्याचे सांगून राजकीय वातावरण तापवले. दरम्यान, आजारपणामुळे पवार यांना जास्त बोलता आले नाही. त्यांचे उर्वरित भाषण राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी वाचले. सायंकाळी पवार पुन्हा हेलिकॉप्टरने मुंबईतील रुग्णालयात रवाना झाले.

शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोनदिवसीय राज्यस्तरीय शिबिराची शरद पवारांच्या भाषणाने शनिवारी सांगता झाली. या वेळी राष्ट्रवादीचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र, कोल्हे यांची गैरहजेरी जाणवत होती. पवार म्हणाले, काँग्रेस सरकारच्या काळात पंडित नेहरूंपासून मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारांनी देशाच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले. मात्र, भाजपच्या राजवटीत देशातील सांप्रदायिकता धोक्यात आणली जात आहे. केंद्रात आणि राज्यात वेगवेगळ्या विचारांची सरकारे असली तरी सत्तेचा मान राखला जात नाही. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून असंवैधानिकरीत्या राज्यातील सत्ता हस्तगत केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मिटकरींच्या वक्तव्यावर जयंत पाटलांची सारवासारव : अजित पवारांचे कट्टर समर्थक प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शरद पवार यांच्या भेटीमुळे राज्यात बळीचे राज्य येणार असल्याची प्रतिक्रिया दिली. आगामी राज्यातील राजकारणाची नांदी त्यांनी माध्यमांशी बोलताना अधोरेखित केली. मिटकरी यांच्या वक्तव्यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कानावर हात ठेवले. व्यक्तिगत संबंध आणि राजकारण वेगळे विषय आहेत. पवार ज्येष्ठ नेते असल्याने मुख्यमंत्री पवारांच्या भेटीस हॉस्पिटलमध्ये जाण्यात गैर काय आहे? या भेटीतील राजकीय अर्थ काढला जाऊ नये, असे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

डॉ. अमोल कोल्हेंच्या नाराजीची चर्चा, शिबिराकडे पाठ
शिबिराला फायरब्रँड नेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मंथन शिबिराकडे पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. डॉ. अमोल कोल्हे हे मंथन शिबिरात “हिंदुत्व आणि शिवाजी महाराजांची कार्यपद्धती’ या विषयावर बोलणार होते. मात्र, वेळेअभावी त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळण्याची शक्यता नव्हती. पक्षाच्या कार्यपद्धतीवरही कोल्हे नाराज असल्याची माहिती आहे. त्यामुळे कोल्हे यांनी या शिबिराकडे पाठ फिरवल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, कोल्हे यांच्याशी दिव्य मराठीने अनेकदा संपर्क साधला. तसेच त्यांना संदेशही पाठवला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

अजित पवार निघून गेले
काही महिन्यांपूर्वी दिल्लीच्या राष्ट्रीय शिबिरातून निघून गेल्यानंतर अजित पवार यांची चर्चा झाली होती. आता शिर्डीतील शिबिराच्या शेवटच्या दिवशी त्यांची उपस्थिती नव्हती. त्यामुळे दिवसभर शिबिरस्थळी याचीच चर्चा होती. याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, अजित पवार कौटुंबिक कारणामुळे आजोळी गेले असून दुसरे काही कारण नाही.

बारा आमदार फुटणार
राष्ट्रवादीचे १० ते १२ आमदार फुटले आहेत. आता त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरायचा बाकी आहे. राष्ट्रवादीने याआधीही पहाटेच्या वेळी भाजपसोबत शपथ घेतली होती. सकाळी कोंबडा बांग देतो तशी ती वेळ होती. आताही शिंदे गटाने हा उठाव केला नसता तर राष्ट्रवादी भाजपसोबत गेली असती.
गुलाबराव पाटील, मंत्री व शिंदे गटाचे नेते

दुसरीकडे काँग्रेसच्या आमदार फुटीच्या चर्चा.. : काँग्रेसचे २२ आमदार फुटणार असून देवेंद्र फडणवीस यांनी तशी तयारी केली आहे, असा दावा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. मात्र, काँग्रेसने टीका केल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...