आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Discussions Took Place Between Deputy Chief Minister Ajit Pawar, Minister Eknath Shinde And MLA Jagtapregarding Ahmednagar Municipal Corporation Eletion

राष्ट्रवादीच्या घड्याळाला धनुष्याचे बाण:उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री एकनाथ शिंदे, आमदार जगताप यांच्यात झाली चर्चा

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 30 जून रोजी महापौर निवडणूक, शिवसेनेचा महापौर तर राष्ट्रवादीचा उपमहापौर ? काँग्रेसची भूमिका मात्र गुलदस्त्यात

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार दीड वर्षांपासून कार्यरत असले तरी नगर शहरात मात्र, स्थानिक महाविकास आघाडीचे सुत जुळत नव्हते. आगामी महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी करूनच लढवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार संग्राम जगताप व शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांनी मंगळवारी मुंबईत घेतला. या निर्णयामुळे राज्यातील महाविकास आघाडी अहमदनगर महापालिकेत आगामी महापाैर निवडणुकीच्या निमित्त दिसणार आहे.

विद्यमान महापाैर बाबासाहेब वाकळे यांचा कार्यकाळ ३० जूनला संपुष्टात येणार आहे, त्याच दिवशी नवीन महापाैरपदाची निवडणूक होणार आहे. महापालिकेने महापाैर निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्याबाबत विभागीय आयुक्तांना प्रस्ताव दिलेला आहे. अद्याप कार्यक्रम जाहीर झालेला नाही. परंतु, महापाैर निवडणुकीसाठी शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. महापाैरपद अनुसुचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना, काँग्रेसकडे या पदाचा उमदेवार आहे. राष्ट्रवादीकडूनही महापाैर पदावर दावा केला जात होता. शिवसेनेनेही महापाैर शिवसेनेचाच होईल असा चंग बांधला होता. त्यामुळे महापाैर निवडीच्या निमित्ताने राष्ट्रवादी व शिवसेनेला एकत्र आणण्याचे आव्हान वरिष्ठ स्तरावरच पेलवण्यात आले.

शिवसेनेच्या आजी व माजी नगरसेवकांचे शिष्टमंडळे मुंबईत गेले होते, त्यावेळी बैठक झाली. प्रथम नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात चर्चा झाली. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, आमदार संग्राम जगताप, संजय शेंडगे, माजी उपमहापाैर अनिल बोरूडे, अनिल शिंदे, उमेश कवडे, सागर शिंदे आदी उपस्थित होते. त्यानंतर आमदार जगताप यांच्यासमवेत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

असे आहे बलाबल :
23 शिवसेना
19 राष्ट्रवादी
15 भाजप
5 काँग्रेस
4 बसपा
1 सपा

शिवसेनेच्या आजी व माजी नगरसेवकांचे शिष्टमंडळे मुंबईत गेले होते, त्यावेळी बैठक झाली. प्रथम नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात चर्चा झाली. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, आमदार संग्राम जगताप, संजय शेंडगे, माजी उपमहापाैर अनिल बोरूडे, अनिल शिंदे, उमेश कवडे, सागर शिंदे आदी उपस्थित होते. त्यानंतर आमदार जगताप यांच्यासमवेत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

या भेटीनंतर ‘दिव्य मराठी’शी बोलताना अनिल शिंदे म्हणाले, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. महापाैर शिवसेनेचा अन् उपमहापाैर राष्ट्रवादी काँग्रेसचा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राष्ट्रवादी पुन्हा एकदा पक्षाच्या १९ नगरसेवकांची बैठक घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुत्रांकडून समजली.

बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ३४ संख्याबळाची आवश्यकता आहे. शिवसेनेचे २३ व राष्ट्रवादीचे १९ यांचे संख्याबळ ४२ होत असल्याने या आघाडीची सत्ता स्थापन होण्यात अडचण नाही. पण ऐनवेळी राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र येऊन जर भाजपची साथ मिळाली तर समीकरण बदलण्यासही वाव आहे.

रोहिणी शेंडगेंना संधी ?
महापाैर पदासाठी राखीव प्रवर्गात शिवसेनेकडून रोहिणी शेंडगे यांचे नाव चर्चेत आहे. त्याबरोबरच रिता भाकरेही शिवसेनेच्याच नगरसेविका आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे रूपाली पारगे, तर काँग्रेसकडून शीला चव्हाण महापाैर पदासाठी उमेदवार ठरू शकतात. पण भाजपकडे राखीव प्रवर्गातील उमेदवारच नाही, त्यामुळे या निवडणुकीत भाजपने काढता पाय घेतलेला आहे.

महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार संग्राम जगताप, शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, शिवसेना शिष्टमंडळाने मुंबईत मंगळवारी चर्चा केली. शिवसेनेच्या शिष्टमंडळात अिनल शिंदे, संजय शेंडगे, अिनल बोरुडे, उमेश कवडे आदींचा समावेश होता.

सध्या राष्ट्रवादीचा वाटा काय ?
सद्यस्थितीत मनपात भाजप सत्तेत असले, तरी विरोधीपक्षनेतेपद, स्थायी समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. महापाैरपद शिवसेनेकडे गेले तर उपमहापाैरपद राष्ट्रवादीला मिळेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. पण प्रत्यक्ष निवडणुकीत काय घडामोडी घडतात, यावर पुढील समीकरण अवलंबून आहे. जर राष्ट्रवादी, बसपा, काँग्रेस व बाहेरून भाजपने पाठिंबा दिल्यास नवे समीकरण होऊ शकते.

अशी गाजली मागील निवडणूक
मागील महापाैर निवडीवेळी राष्ट्रवादीने मदत केल्यामुळे १४ नगरसेवक असलेल्या भाजपने सत्ता स्थापन केली होती. तर सर्वाधिक २४ नगरसेवक असलेल्या शिवसेनेला विरोधी बाकावर बसावे लागले होते. दरम्यान, स्थायी समितीपद राष्ट्रवादीला देताना, शिवसेनेने आघाडी धर्म पाळला होता. आता महापाैर निवडीत राष्ट्रवादी आघाडी धर्म पाळणार का याबाबत चर्चा होत आहे.

काँग्रेसची भूमिका गुलदस्त्यात
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसची भूमिका काय असेल, याबाबत शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांना विचारले असता, त्यांनी प्रतीक्रिया दिली नाही. त्यामुळे काँग्रेसची नेमकी भूमिका सध्यातरी गुलदस्त्यात आहे. महापाैरपदासाठी बहुमताचा आकडा राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र येऊन गाठू शकतात. काँग्रेसकडे पाच संख्याबळ आहे.

शिवसेना एकसंघच
झालेला निर्णय वरिष्ठ स्तरावरूनच झालेला आहे. शिवसेनेचा महापाैर होणार आहे. शिवसेनेचे सर्व नगरसेवक चांगले काम करतील. ज्या वेळी शिवसेनेचे महापाैर झाले आहेत, यांच्या कार्यकाळात चांगले कामे झाले. या कार्यकाळातही चांगले कामे करतील. कोणतेही गट तट नाही, शिवसेना एकसंघच आहे.'' दिलीप सातपुते, शहर प्रमुख, शिवसेना.

...तेव्हा शिवसेना अन् राष्ट्रवादीत वितुष्ठ
७ एप्रिल २०१८ रोजी शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांची हत्या झाली होती. केडगाव उपनगरातील पोटनिवडणुकीच्या वादातून ही हत्या झाली होती. यावेळी आक्रमक झालेले शिवसेनेचे नगरसेवक, अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक केली. एव्हढेच नाही तर गुन्ह्याचा थेट संबंध राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याशीही जोडण्यात सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना यश आले. उद्धव ठाकरेंसह सेनेचे वरिष्ठ नेते नगर शहरात दाखल झाले. शिवसेना- भाजप सरकारमधील गृह राज्यमंत्री तर नगरमध्ये ठाण मांडून बसले होते. या वाढत्या राजकीय दबावामुळे अखेर आमदार जगताप यांना अटक झाली, त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयावरच हल्ला केला. तीन महिन्यांनी जगताप यांना जामीन मिळाला. या घटनेपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीत मोठे वितुष्ट निर्माण झालेले आहे. त्यामुळेच सर्वाधिक २४ जागा मिळून देखील शिवसेनेला महापालिकेच्या सत्तेपासून दूर राहावे लागले होते. आता मात्र सर्व राग- लोभ आणि जुने भांडणे विसरून हे दोन्ही पक्ष एकत्रित महापालिकेत सत्तेवर येण्याची चिन्हे आहेत.

बातम्या आणखी आहेत...