आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंदाजपत्रकीय सभेनंतर झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सभापती गणेश कवडे यांच्यासह सदस्यांनी विस्कळीत पाणी पुरवठ्यावर पुन्हा एकदा आवाज उठवला. मात्र, उपायुक्त यशवंत डांगे यांनी आर्थिक अडचणीचे कारण देत जोपर्यंत आर्थिक उत्पन्नाचे सोर्स सुधारत नाहीत, तो पर्यंत अशीच परिस्थिती राहील, असे स्पष्ट केले व सदस्यांची बोलती बंद केली. अखेर सभापती कवडे यांनी काहीतरी करा, असे म्हणत हा विषयच गुंडाळला. मागील महिन्यात पाणीपट्टी वाढवण्यास नकार देणाऱ्या स्थायी समितीची उपायुक्त यशवंत डांगे यांनी सोमवारी चांगलीच कोंडी केली. सभेत पाणी पुरवठ्यातील विस्कळितपणावर सभापती कवडेंसह सभागृह नेते विनित पाऊलबुद्धे व अन्य नगरसेवकांनी जाब विचारला.
आमच्या प्रभागात घाण पाणीपुरवठा होत असून, पाइपलाइनचे लिकेज काढण्यासाठी जमीन खाेदायला मनपाकडून माणसे मिळत नाहीत. त्यामुळे आमच्या नागरिक बाहेरून विकतचे पाणी आणतात, अशी व्यथा सभापती कवडेंनी मांडली. त्यावर अभियंता निकम यांनी उत्तर देताना पाणीपुरवठा विभागाला पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे स्पष्ट केले. सभापती कवडे यांनी उपायुक्त यशवंत डांगेंना याबाबत विचारला. आऊटसोर्सच्या लोकांच्या कामाची देयके देण्यासाठी पैसे नाहीत, ठेकेदारांची देयके आपण वेळेवर देऊ शकत नाही, म्हणून लेबर कमी दिले जातात व त्यामुळे या कामात विस्कळितपणा आला आहे. जोपर्यंत मनपाचे आर्थिक सोर्स सुधारत नाहीत, तोपर्यंत हीच स्थिती राहील, असे डांगे यांनी यावर स्पष्ट केले. त्यानंतर डांगेसाहेब, काहीतरी करा, असे म्हणत सभापती कवडेंनी हा विषयच गुंडाळून टाकला. दरम्यान, स्थायी समितीत काँग्रेस नगरसेविका रुपाली वारे यांनी मनपा पाणीपुरवठा विभागप्रमुख यंत्र अभियंता परिमल निकम यांचे जाहीर आभार मानून त्यांचे अभिनंदनही केले. नवनागापूर येथे मनपा पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला बेकायदेशीरपणे घेतले गेलेले बेकायदेशीर पाणी कनेक्शन्स निकम यांनी तोडून बंद करून टाकले. राजकीय दबावाची तमा न बाळगता निकम यांनी केलेल्या या कारवाईबद्दल त्यांचे अभिनंदन व वारे यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.