आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा विस्कळित:महावितरणच्या संपामुळे पाणीपुरवठा विस्कळीत

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका नगर शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला बसला. मंगळवारी (३ जानेवारी) मध्यरात्रीपासून खंडित झालेला वीजपुरवठा उशिरा पूर्ववत झाला. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांचा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. वसंत टेकडीसह, आरटीओ, सरोष पाण्याची टाकी येथील वीजपुरवठा बंद झाला होता.

वीजपुरवठा सुरू करण्याबाबत वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद मिळत नव्हता. वसंत टेकडी येथील स्थानिक कार्यालयही बंद होते. अखेर महापालिकेने विनंती केल्यानंतर बुधवारी (३ जानेवारी) सकाळी ९.३० वाजता वीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा सुरू झाला.

सलग ९ ते १० तास वीजपुरवठा बंद राहिल्याने पाण्याच्या टाक्या भरता आल्या नाहीत. तसेच, वसंत टेकडी येथून थेट विद्युत मोटारीद्वारे निर्मलनगर, लक्ष्मीनगर, तपोवन रोड परिसर, सूर्यनगर, मुकुंदनगर आदी उपनगरांना पाणीपुरवठा होतो. मात्र, विजेअभावी वीजपंप बंद असल्याने पाणीउपसा होऊ शकला नाही. परिणामी, बुधवारी शहराच्या मध्यवर्ती भागातील कोठला, मंगलगेट, झेडींगेट, दाळमंडई, रामचंद्र खुंट, काळु बागवान गल्ली, धर्ती चौक, माळीवाडा, कोठी, कलेक्टर कचेरी परिसर, तसेच गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हडको, प्रेमदान हडको, टीव्ही सेंटर हडको, बिशप लॉईड कॉलनी आदी परिसरात पाणीपुरवठा झाला नाही.

या भागात आज (गुरुवारी) पाणी सोडण्यात येणार आहे.तसेच, सिध्दार्थनगर, सर्जेपुरा, तोफखाना, लाल टाकी, दिल्ली गेट, नालेगाव, चितळे रोड, खिस्त गल्ली, आनंदी बाजार, कापडबाजार माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर व सावेडी परिसरात गुरुवारी ऐवजी शुक्रवारी पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...