आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना धास्ती:अहमदनगर जिल्ह्यात अजूनही 1.16 लाख टन ऊस शिल्लक, 16 कारखान्यांचा पट्टा पडला

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्ह्यातील एकूण २३ पैकी १६ कारखान्यांचा गाळप हंगाम पूर्ण झाला असून सध्या फक्त ७ सहकारी साखर कारखान्यांतून गाळप सुरू आहे. या सात कारखान्यांना कार्यक्षेत्रात उपलब्ध असलेल्या १ लाख १६ हजार ५०० टन शिल्लक उसाचे गाळप करण्याचे आव्हान आहे.

सध्या पावसाळा तोंडावर आला असून आठवड्याभरात हे गाळप करावे लागणार आहे. उपलब्ध उसाचे गाळप करण्याचे नियोजन नगर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने केले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील १४ सहकारी व ९ खासगी कारखान्यांनी २९ मे अखेर सुमारे १ कोटी ८३ लाख ७६ हजार १८० टनांचे गाळप करून १ कोटी ८३ लाख ९० हजार २५८ क्विंटल साखरेचे उत्पादन काढले. यावर्षी जिल्ह्यातील सहकारी, खासगी कारखान्यांनी विक्रमी गाळप करूनही अद्यापही सात सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात १ लाख १६ हजार ५०० टन ऊस उपलब्ध आहे. यामध्ये कोपरगावच्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात २ हजार टन, राहाता तालुक्यातील गणेश कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ९ हजार ५०० टन, संगमनेरच्या थोरात कारखान्याच्या कार्यक्षेत्रात २७ हजार ५०० टन, श्रीरामपूर तालुक्यातील अशोक कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ५० हजार टन, नेवासे तालुक्यातील मुळा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात २३ हजार टन, भेंडा येथील ज्ञानेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ५०० टन, पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ४ हजार टन ऊस उपलब्ध आहे.

२४१२ हेक्टर ऊस शिल्लक

अहमदनगर जिल्ह्यातील सहा तालुक्यात सध्या ऊस उपलब्ध आहे. यामध्ये कोपरगाव तालुक्यात ४२ हेक्टर, श्रीरामपूर तालुक्‍यात सर्वाधिक १ हजार २५३ हेक्टर, राहाता १५० हेक्टर, संगमनेर ४८३, नेवासे ४१७, पाथर्डी ६७ हेक्टर असा एकूण २ हजार ४१२ हेक्‍टरवर सुमारे १ लाख १६ हजार ५०० टन ऊस उपलब्ध आहे.

या कारखान्यांचा गाळप हंगाम पूर्ण

कोपरगावचा काळे कारखाना, राहुरीतील तनपुरे कारखाना, श्रीगोंद्यातील श्रीगोंदे कारखाना, अकोल्यातील अगस्ती कारखाना, शेवगाव तालुक्यातील केदारेश्वर, श्रीगोंद्यातील कुकडी, प्रवरा नगरचा पद्मश्री विठ्ठलराव विखे, पारनेरचा क्रांती शुगर, नगर तालुक्यातील पीयूश, कर्जतचा अंबालिका, शेवगावचा गंगामाई, श्रीगोंद्यातील साईकृपा, साजन शुगर, वांबोरी प्रसाद शुगर, जामखेडचा जय श्रीराम, संगमनेरचा युटेक यांनी आपला हंगाम पूर्ण केला.

५ जूनपर्यंत कारखाने सुरू राहतील

गाळप हंगाम सुरू असलेल्या शंकरराव कोल्हे, गणेश कारखाना, थोरात, अशोक, मुळा, ज्ञानेश्वर आणि वृद्धेश्वर या सात कारखान्यांची गाळप क्षमता प्रतिदिन ३२ हजार ७५० टनाची आहे. या कारखान्यांनी पूर्ण क्षमतेने गाळप केल्यास पाच ते सहा दिवसात जिल्ह्यातील उर्वरित उसाचे गाळप होईल. ५ जूनपर्यंत हे कारखाने सुरू राहतील.

- मिलिंद भालेराव, प्रादेशिक (साखर) सहसंचालक, अहमदनगर

बातम्या आणखी आहेत...