आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोंडी:दौरे, बैठका करा; पण इंधन उधारीवर भरुन..! महसूलमंत्री थोरात यांच्या जिल्ह्यातच आठ तहसीलदारांचा प्रवास सरकारी ‘वाहनांविना’

नगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील आठ तहसीलदार व दोन प्रांताधिकाऱ्यांना सरकारी वाहने नसल्याने दौरे व बैठकांसाठी खासगी वाहनांवर अंबर दिवा लावून प्रवास करावा लागत आहे. त्यातही या भाड्याने घेतलेल्या खासगी वाहनांत व ज्यांच्याकडे सरकारी वाहने आहेत त्या तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांना इंधन भरण्यासाठी वेळेवर इंधन खर्च मिळत नसल्याने पेट्रोल पंपावर उधारीवर इंधन भरून बैठका व दौरे करावे लागत आहेत.

“सरकारी काम आणि जरा थांब’ याचा प्रत्यक्षात अनुभव महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नगर जिल्ह्यातच महसूल खात्यात अंतर्गत असलेल्या आठ तहसीलदार व दोन प्रांताधिकाऱ्यांना येत आहे. सरकारी कामांसाठी शासकीय वाहने नसल्याने त्यांच्यावर कुणी भाडेतत्त्वावर वाहने देता का वाहने ? असं म्हणण्याची वेळ या अधिकाऱ्यांवर आली आहे. वर्षभरात तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्या वाहनातील इंधनावर ५१ लाखांचा खर्च झाला आहे. ४४ लाख रुपयांचे इंधनाची बिले अद्यापही रखडली आहेत.

राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा नगर जिल्हा आहे. जिल्ह्यात १४ तालुके आहेत. या प्रत्येक तालुक्यात एक तहसीलदार आहे. तर सात उपविभागात सात प्रांताधिकारी आहेत. महसूलमंत्री असलेल्या थोरात यांच्या महसूल विभागाअंतर्गत असलेल्या जिल्ह्यातील आठ तहसीलदार व दोन प्रांतांधिकाऱ्यांच्या सरकारी वाहनांची मुदत दोन ते साडेतीन लाख किमीचा प्रवास केल्यानंतर संपल्याने ही वाहने जमा केली होती. मागणी करूनही या आठ तहसीलदारांना व दोन प्रांत अधिकाऱ्यांना सरकारी वाहने मिळत नसल्याने त्यांना खासगी वाहने घेऊन त्यात उधारीवर इंधन भरुन बैठका, दौरे करावे लागत आहेत. महसूलमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांच्या बैठकांनाही खासगी वाहने घेऊन हजर राहावे लागते.

बातम्या आणखी आहेत...