आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआरोग्याची धनसंपदा जपायची असेल, तर हसतमुख, आनंदी, कार्यमग्न राहणे आवश्यक आहे. योग प्राणायाम हे निरोगी जीवनाचे कवचकुंडलं आहेत म्हणून योगाचे सातत्य टिकवा व आपल्याबरोबर पुढच्या पिढीत योग संक्रमित करा, असे आवाहन पारस उद्योग समूहाचे संचालक संतोष बोथरा यांनी केले.
आठव्या जागतिक योग दिनानिमित्त योग विद्या धाम अहमदनगर संस्थेतर्फे आनंद विद्यालयाच्या डिफेन्स स्पोर्ट क्रिकेट अकॅडमीच्या विस्तीर्ण प्रांगणात आयुष मंत्रालय निर्धारित योग वर्ग घेण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव व जागतिक योग दिन यानिमित्त चित्रकला निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. त्यांचा पारितोषिक वितरण बोथरा यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक योगीराज गाडे होते. उद्योजक व बांधकाम व्यावसायिक मोहन मानधना, आनंद एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विलास शेटे, योग विद्या धामचे अध्यक्ष डॉ. सुंदर गोरे, आनंद एज्युकेशन सोसायटीचे शरदकुमार झंवर, सचिव किसन तरटे आदी उपस्थित होते.
योगिराज गाडे म्हणाले, २१ जून आशिया खंडातील सर्वात मोठा दिवस म्हणून आजच्या दिवसाला भौगोलिक, जैवविविधतेच्या दृष्टीने देखील आगळेवेगळे महत्त्व आहे. संयुक्त राष्ट्र संघ अर्थात अखिल विश्वाने योग-प्राणायाम या प्राचिन विधीला मान्यता दिली. अखिल विश्व भारताचे अनुकरण करत आहे. यामध्ये आपण मागे राहू नका.
उद्योजक मोहन मानधना यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. अहमदनगर शहर व जिल्ह्यांमध्ये योगाचा वटवृक्ष लावणाऱ्या योग विद्याधाम संस्थेचे कार्य अतुलनीय आहे, अशा शब्दांत त्यांनी कौतूक केले.
आनंद एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विलास शेटे यांनी जागतिक योग दिन व पतंजली महामुनी यांनी सांगितलेल्या योग आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात त्याचे महत्त्व याबाबत माहिती दिली. आजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ वैशाली एकबोटे यांनी गायलेल्या योग गिताने झाला. प्रास्ताविक योग महोत्सव प्रकल्प प्रमुख अॅड. सिध्दार्थ वाघमारे यांनी केले. संस्था परिचय दत्तात्रय दिकोंडा यांनी करून दिला. पाहुण्यांचा परिचय कृष्णराव बागडे यांनी करून दिला. विविध स्पर्धांच्या पारितोषिकांची घोषणा योग महोत्सव सहप्रकल्प प्रमुख संजय जोशी यांनी केली. सूत्रसंचालन मुग्धा शुक्रे यांनी केले. कार्याध्यक्ष जयंत वेसीकर यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.