आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाईबाबांच्या आगमनापूर्वी ओसाड असलेली शिर्डी साईबाबांनी आपल्या हयातीत वृक्षारोपण करून हिरवीगार केली होती. कालांतराने बेसुमार वृक्षतोडीमुळे वृक्षाविना शिर्डी ओसाड झाली होती. शिर्डीचे चित्र पूर्ववत करण्यासाठी सात वर्षांपूर्वी शिर्डीतील ग्रीन अँड क्लीन फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी शांघायच्या धर्तीवर शिर्डीत वृक्षारोपण करून जगाला पर्यावरणाचा संदेश दिला. आज सुमारे ९ हजारांवर डेरेदार वृक्ष मोठ्या दिमाखात रखरखत्या उन्हात साईभक्तांना सावली देऊन साईसेवेचा मंत्र जोपासत आहेत.
शिर्डीला रोज विविध राज्यांतून एक लाखांच्या वर भाविक येतात. याच भूमितून जगात व देशात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करून वाढते तापमान रोखण्याची कल्पना ग्रीन अँड क्लीनच्या कार्यकर्त्यांना सुचली. शांघायच्या धर्तीवर शिर्डीत वृक्षारोपण करता येणे शक्य असल्याने २०१६ मध्ये शिर्डीतील विविध रस्त्यांवर झाडे लावण्याच्या योजनेचा श्रीगणेशा झाला. पहिल्या टप्प्यात १० ते १२ फूट उंच व दोन वर्षे वयोमान असलेल्या ९ हजार वृक्षांची लागवड केली. फक्त झाडे लावण्यावर न थांबता या झाडांची निगा राखण्याची जबाबदारीही पदाधिकाऱ्यांनी घेतली.
आंध्र प्रदेशातून आणली हजारो झाडे : रस्त्यांवर वृक्षारोपण करण्यासाठी आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथील साईदेवा नर्सरीतून मोठमोठे हजारो वृक्ष आणले. साई संस्थानने विकसित केलेल्या रिंगरोड, नवीन पिंपळवाडी रोड, नाला रोड, शिर्डी-साकुरी शीव रोड, कनकुरी रस्ता आदी रास्त्यांवर विविध प्रजातीच्या हजारो वृक्षांची लागवड केली. यामध्ये फायकस, गुलमोहर, नीलमोहर, पेल्टाफाय, निंब, वड, पिंपळ, कदंब, पँथोडिया, बेल, कांचन, पुतृंजीवा, आवळा या वृक्षांचा समावेश आहे. वृक्षारोपणावर एक कोटी खर्च : तीन वर्षांत शिर्डी आणि परिसरातील प्रमुख रस्त्यांवर लावलेल्या झाडांची निगा राखताना आठवड्याला किमान ७२ हजार लिटर पाणी देण्याची व्यवस्था आल्याने झाडांची उत्तम वाढ होऊ शकली. यासाठी स्थानिक शिर्डीकरांनी वृक्षांची जिवापार जपवणूक केली. अजित पारख, ताराचंद कोते, गोपीनाथ गोंदकर, रवी गोंदकर, कमलाकर कोते यांनी पाणी आणि टँकरची व्यवस्था करून देखभाल केली. सात वर्षांत वृक्षांच्या संगोपणासाठी ग्रीन अँड क्लीनने एक कोटी रुपयांचा खर्च केला आहे.
शांघायच्या धर्तीवर देशातील पहिला प्रयोग शांघायच्या धर्तीवर देशातील हा पहिला प्रयोग आहे. शिर्डीत उन्हाळ्यात ४० अंशाच्या पुढे तापमान असते. वृक्षारोपणामुळे दाेन वर्षांपासून तापमान तीन अंशांनी कमी करण्यात यश आले. शिर्डीत ९ हजार, तर शिर्डी परिसरात तीन हजार झाडांचे वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्यात आले. - डॉ. जितेंद्र शेळके पाटील, ग्रीन अँड क्लीन शिर्डी
अपत्याप्रमाणे केले संगोपन अपत्याप्रमाणेच शिर्डीकरांनी झाडांचे संगोपन केले. वृक्ष लागवडीची ही चळवळ देश-विदेशातही पोहोचवण्याचे काम साईभक्तांच्या माध्यमातून यशस्वीरीत्या होत आहे. - कैलासबापू कोते, प्रथम नगराध्यक्ष, शिर्डी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.