आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी:वर्षभरात जिल्ह्यातील 6 हजार 820 शेतकऱ्यांनी केले माती व पाणी परीक्षण

नगर \ गणेश देलमाडेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस घटत आहे. जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. परिणामी उत्पादन खर्चात वाढ होऊन उत्पन्न घटत आहे. त्यामुळे शेती आतबट्याची ठरत आहे. त्यामुळे पिके घेताना शेतकऱ्यांनी जमिनीचे माती व पाणी परीक्षण करून घेणे आवश्यक आहे. नगर जिल्ह्यात चालू वर्षात ६ हजार ८२० शेतकऱ्यांनी माती व पाणी नमुन्यांचे परीक्षण केले. सन २०२१ मध्ये फक्त २ हजार १३६ शेतकऱ्यांनी माती व पाणी परीक्षण केले होते. गतवर्षीच्या तुलनेत यामध्ये तीनपट वाढ झाली. जिल्ह्यातील जमिनीचा सुपीकता निर्देशांक म्हणजे नत्र, स्फुरद, पालाशचे प्रमाण कमी-मध्यम- मध्यम असे आहे.

शेतीत पाणी व खतांचा अतिरेकी वापर यामुळे जमिनीची सुपीकता घटत आहे. माती व पाणी परीक्षणातून जमिनीत कोणते घटक कमी व जास्त आहे, याची माहिती मिळते. नगर शहरातील भुतकरवाडी येथील अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळा आहे. यात शेतकऱ्यांना नाममात्र दरात परीक्षण करून दिले जाते.

नगर जिल्ह्यात चार प्रकारची जमीन
जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र १७ लाख हेक्‍टर आहे. यामध्ये लागवडीखालील १४ लाख हेक्‍टर, खरिपाचे सरासरी क्षेत्र ४.४८ लाख हेक्‍टर, तर रब्बीचे सरासरी क्षेत्र ६.४५ लाख हेक्‍टर आहे. एकूण बागायती क्षेत्र ३.५८ लाख हेक्टर असून हे प्रमाण २६ टक्के आहे. नगर जिल्ह्यात जमिनीचे चार प्रकार आहेत. यामध्ये हलक्‍या प्रकारची जमीन २४ टक्के, मध्यम ३८ टक्के, भारी काळी जमीन ३६ टक्के, तांबड्या प्रकारची जमीन २ टक्के आहे.

पिकांच्या उत्पादन वाढीस मदत
^ माती व पाणी परीक्षण करणे सर्व पिकांसाठी आवश्यक आहे. विशेष करून ऊस, कापूस, गहू, हरभरा, संत्रा, मोसंबी, लिंबू, डाळिंब, पेरू, आंबा, सीताफळ, द्राक्षे, कांदा व भाजीपाला या पिकांच्या लागवडीपूर्वी माती व पाणी परीक्षण करणे फायदेशीर ठरते. माती व पाणी परीक्षणाने संभाव्य नुकसान टाळून उत्पादन वाढीत मदत होते.'' रोहन भोसले, प्रभारी जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी, अहमदनगर.

सन २०२१ मध्ये २१३६ नमुन्यांची केली तपासणी
अहमदनगर येथील मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळेत २०२१ मध्ये साधे माती नमुने
२१२, पाणी १२४ नमुने, विशेष १ हजार ४८६ नमुने, सुक्ष्म १०४ नमुने, १० सेंद्रिय शेती गटाने २१० असे एकूण २ हजार १३६ माती व पाणी नमुन्यांचे परीक्षण केले. कोरोना लॉकडाऊनमुळे यात घट झाल्याचे दिसून येत आहे.

या घटकांची होते तपासणी
माती व पाणी नमुन्याच्या तपासणीत जमिनीतील सेंद्रिय कर्ब, स्फुरद, पालाश, पीएच, ईसी व पाण्यातील कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम क्लोराइड, कार्बोनेट, बायकार्बोनेट, सल्फेट, विद्राव्य क्षार, सोडियमचे इतर कॅटायन्सचे प्रमाण, मुक्त चुना, जमिनीचा पोत, तांबे, लोह, झिंक, मॅंगनीज या घटकांची तपासणी केली जाते.

बातम्या आणखी आहेत...