आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत ग्रामस्तरावर घनकचरा व सांडपाणी प्रकल्प उभारण्यात येत आहेत. परंतु, बहुतांश ग्रामपंचायतींकडे प्रकल्पांपर्यंत कचरा वाहतुकीची व्यवस्थाच नाही. यापार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने चौदाव्या वित्त योगाचार्या शल्लक निधीतून ४ कोटी ८१ लाखांच्या १६० ईलेक्ट्रिक कचरा वाहतूक गाड्या खरेदीचा निर्णय घेतला आहे. या खरेदीसाठी जिल्हा परिषद स्तरावरून निविदा मागवण्यात आल्या आहेत. अहमदनगर जिल्हा २०१८ मध्येच हगणदारीमुक्त झाला असल्याचा प्रशासनाचा दावा असला तरी अजूनही ग्रामीण भागात शौचालयांची १०० टक्के अंमलबजावणी झाली नाही ही वस्तुस्थिती आहे. ग्रामीण भागात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची सुमारे ५३६ कामे करण्याचे उद्दिष्ट असून सुमारे ४५० कामांना प्रशाकीय मान्यता देण्यात आल्या आहेत. काही भागात प्रकल्प उभारणी सुरू झाली असली तरी गती मिळाली नाही.
अशा स्थितीत प्रशासक मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी महिनाभरात तालुकास्तरावर घेतलेल्या बैठकांत ईलेक्ट्रिक कचरा वाहतूक करणारी वाहने खरेदीबाबत सूचना दिल्या आहेत. ग्रामपंचायतींकडून पंधराव्या वित्त आयोगातून अशी वाहने खरेदीसाठी कामबदलाचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात येत आहेत. आता जिल्हा परिषदेनेच १६० इलेक्ट्रिक वाहने खरेदीचा निर्णय घेतल्याने पुढील दोन महिन्यात ग्रामीण रस्त्यांवर अशी वाहने कचरा संकलन व वाहतूक करताना दिसून येतील.
गाड्या वाटपाचा मुद्दा कळीचा
जिल्हा परिषद खरेदी केलेली वाहने ग्रामपंचायतींना वाटप करणार आहे, परंतु ग्रामपंचायतींची संख्या १ हजार ३१९ आहे. त्यामुळे मागणी वाढल्यास खरेदी केलेल्या १६० गाड्या कोणत्या ग्रामपंचायतींना द्यायच्या असा पेच निर्माण झाला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हस्तक्षेप वाढल्यास वाटपाचा मुद्दा कळीचा ठरणार आहे.
सीईओ येरेकर यांच्याशी चर्चा करणार
कचरा वाहतुकीसाठी नव्याने १६० इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. ही वाहने खरेदीनंतर ग्रामपंचायतींना वाटप करायची आहेत. वाटपाचा निकष ठरवावा लागणार आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याशी चर्चा करून वाटपाचा निकष ठरवणार आहोत. एस. एस. शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी.
अशी असेल ३ चाकी इलेक्ट्रिक गाडी
कचरा वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक गाडीची क्षमता किमान ३०० किलो तर एका चार्जींगमध्ये किमान ४० किलोमिटर धावू शकेल, अशी वाहने खरेदी करण्याचे नियोजन आहे. विशेष म्हणजे ही वाहने तीन चाकी असणार आहेत, अशी प्राथमिक माहिती जि.प. प्रशासनाकडून समजली. या वाहनाचा फायदा माझी वसुंधरा अभियानातही होणार आहे.
निकष ठरवावा लागेल
ई-कचरा गाड्या खरेदीसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत, महिनाभरात गाड्या खरेदीची प्रक्रिया होऊ शकते. तत्पूर्वी खरेदी केलेल्या कचरागाड्या वाटपाचा निकष निश्चित करावा लागणार आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष येरेकर निर्णय घेणार आहेत. यासाठी ग्रामपंचायत विभागप्रमुखांसमवेत बैठकीत निर्णय होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.