आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अवघे शहर जलमय झाले. ओढे-नाले बुजवून नैसर्गिक प्रवाह बंद केल्याने सावेडी उपनगर परिसरातील अनेक वसाहत घरांमध्ये पाणी घुसले होते. मात्र, पाणी ओसरल्यानंतर घरात साचलेला गाळ काढताना नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. पाइपलाइन रोडवरील वैष्णवी नगर परिसरात रविवारीही नागरिकांच्या घरातून गाळ काढण्याचे काम सुरू होते. पावसाचे पाणी शिरल्याने या भागातील नागरिकांच्या घरातील साहित्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
गेल्या काही वर्षांपासून उपनगर परिसरात लोकवस्ती वाढत आहे. अनेक ठिकाणी भूखंड माफियांचे लेआऊट मंजूर करताना ओढे-नाले बुजवण्यात आले आहेत. नैसर्गिक प्रवाह बंद करुन पाइप टाकण्यात आले आहेत. परिणामी, दत्तात्रय कुलकर्णी, नारायण साबळे, पी. एल. कुलकर्णी, अरुण बडे, प्रवीण लोखंडे, जीवन क्षीरसागर, शंकरराव गर्जे या वैष्णवी कॉलनीत राहणार्या नागरिकांच्या घरात ओढे-नाल्यांना आलेल्या पुराचे पाणी घुसले. यात घरातील फर्निचर, वाहने, कपडे यासह धान्याचेही नुकसान झाले आहे. पाणी ओसरल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून या भागातील नागरीक आता अस्वच्छेचा सामना करत आहेत. अनेकवेळा आम्ही नागरिकांनी व आमच्या भागातील नगरसेवकांनी बुजविलेल्या ओढे-नाल्यांमुळे होणार्या त्रासाची माहिती महापालिकेला दिली. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. आमच्या नुकसानीला महापालिकाच जबाब आहे. मनपाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
नुकतेच धान्य भरले होते
नंदनवन कॉलनी, तांबटकर मळा भागातील ओढे-नाले बुजविण्यात आले आहेत. त्यामुळे नैसर्गिक प्रवाह बंद होऊन आमच्या घरात पाणी शिरले. काही नागरिकांनी धान्य भरले होते. त्याचे मोठे नुकसान झाले. अनेक नागरिकांच्या वाहनांचेही नुकसान झाले, असे या काॅलनीचे अध्यक्ष अरुण बड यांनी सांगितले.
फर्निचरचे मोठे नुकसान मनपाने भरपाई द्यावी
आम्ही नागरिक व आमच्या भागाचे माजी नगरसेवक निखिल वारे यांनी ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणांबाबत अनेकवेळा महापालिकेत तक्रारी केल्या. माजी नगरसेवक वारे यांनी पाठपुरावाही केला. मात्र, त्याची दखल घेतली नाही. परिणामी, पावसाच्या पाण्याने नागरिकांच्या घरातील फर्निचर व इतर साहित्याचे नुकसान झाले. महापालिका याला जबाबदार आहे. मनपाने नुकसान भरपाई द्यावी.''शंकरराव गर्जे, नागरिक
मनपा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मोठे नुकसान
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे येथील नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागला. पाणी घरात घुसल्याने मोठे नुकसान झाले. अद्यापही चेंबर तुंबलेले आहेत. ओढे-नाल्यांमध्ये टाकलेले पाइप तत्काळ काढावेत. मनपाकडे याबाबत तक्रारी करुनही दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या नागरिकांचे नुकसान झाले. त्यांना भरपाई मिळणे आवश्यक आहे.'' निखील वारे, माजी नगरसेवक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.