आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगमनरमध्ये ठाकरे गटात अंतर्गत कलह:पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांचा पुतळा जाळला, कार्यकारिणीवरून वाद

प्रतिनिधी | नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपर्क प्रमुख बबन घोलप यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघातील नूतन कार्यकारणी जाहीर केली होती. मात्र, तिला वरिष्ठांकडून स्थगिती मिळाल्याने येथील शिवसेनेतील अंतर्गत कलह समोर आला. या घडामोडीला जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांना जबाबदार धरत संतप्त पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (५ नोव्हेंबर) सकाळी संगमनेर बसस्थानकासमोर खेवरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

शिर्डी लोकसभा मतदार संघातील नूतन कार्यकारणी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या मर्जीप्रमाणे न झाल्याने मतदारसंघात अंतर्गत वाद उफाळला. बबन घोलप यांच्या विरोधात आंदोलने करण्यात येत असताना आता कार्यकारणी बरखास्त झाल्याने खेवरे यांच्या विरोधात संगमनेरचे शिवसैनिक रस्त्यावर उतरले.

जिल्हाप्रमुख खेवरे यांच्या तालुक्यात शिवसेनेचा एकही पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य नाही. राहुरी व देवळाली प्रवरा नगरपरिषदेमध्ये नगरसेवक नाही. सेटलमेंट करून शिवसेना उमेदवाराला पाडण्यासाठी त्यांचे प्रयत्न असतात, असा आरोप पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला.

सामना मुखपत्रातून शिवसेनेची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली. मात्र, तिला स्थगिती देण्यासाठी खेवरे यांनी प्रयत्न केल्याचे निदर्शनास आल्याने पदाधिकारी संतप्त झाले. ज्या पदाधिकाऱ्यांना पदे मिळाले नाही, त्यांची माथी भडकवण्याचे काम खेवरे यांनी केल्याने ‘खेवरे हटाव, शिवसेना बचाव’ अशा घोषणा देत यावेळी निषेध करण्यात आला. आंदोलनात बरखास्त झालेल्या कार्यकारिणीतील एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता, हे विशेष.

शिंदे गट व भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संपर्कात असलेल्या काही पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी वरिष्ठांपर्यंत गेल्याने तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांना नव्या कार्यकारणीतून डावलण्यात आले. यामुळे ठाकरे समर्थकातील दोन गटातील सामना रंगला आहे.

दरम्यान, स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर असल्याने शिवसेनेतील गटबाजीचा फटका पक्षाला बसू शकतो. काही आजी-माजी निष्ठावंत शिवसैनिकांना विश्वासात घेतले जात नसल्याने त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे. गद्दारांना पक्षातून काढून नव्या-जुन्याच मेळ घालत नवीन कार्यकारणी जाहीर करावी, अशी चर्चा होत आहे. आता पुन्हा होणाऱ्या नूतन कार्यकारणीवर कोणाची वर्णी लागते, याकडे तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून आहे.

पुतळा दहन करणाऱ्यांवर कारवाई करा

शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या पुतळ्याचे दहन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, शहर प्रमुख प्रसाद पवार, उपजिल्हा प्रमुख अ‍ॅड. दिलीप साळगट, माजी जिल्हाप्रमुख जयवंत पवार, युवा सेनेचे गुलाब भोसले, अमोल कवडे, पप्पू कानकाटे, सोमनाथ काळे, अशोक सातपुते, संतोष कुटे, समीर ओझा, रवी गिरी, बाळासाहेब घोडके आदींनी पोलिस उपअधीक्षक राहुल मदने यांना दिलेल्या निवेदनातून केली.

बातम्या आणखी आहेत...