आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजचोरांविरुद्ध धडक कारवाई:वर्षभरात राज्यात 317.45 कोटींच्या वीजचोऱ्या उघड, महावितरणतर्फे 22 हजार 987 ठिकाणी छापे

अहमदनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०२१-२२ मध्ये तब्बल ५५७ दशलक्ष युनिट विजेची चोरी पकडत महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने ऐतिहासिक कामगिरी केली. राज्यात २२ हजार ९८७ ठिकाणी ३१७ कोटी ४५ लाख रुपयांच्या वीजचोऱ्या विभागाने उघडकीस आणल्या आहेत. त्यापैकी १७२ कोटी ४५ लाख रुपयांची वसुली झाली आहे. या विक्रमी कामगिरीमुळे महावितरणची वीजहानी कमी होण्यासोबतच महसुलातही वाढ झाली.

वीजचोरी विरोधात धडक कारवाईसाठी काम करणा-या महावितरणमधील सुरक्षा व अंमलबजावणी विभागांतर्गत राज्यात परिमंडलस्तरावर ८, मंडलस्तरावर २० तर विभागीयस्तरावर ४० असे एकूण ७१ पथके आहेत. यात सुमारे ३४५ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यामधील मंडलस्तरावरील २० पथके गेल्या नोव्हेंबर २०२१ मध्ये नव्याने स्थापन करण्यात आली आहेत.

सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वीजवापराचे विश्लेषण करून संशयित ठिकाणी वीजयंत्रणेची तपासणी करण्याच्या मोहिमेस वेग दिला आहे. त्यामुळे वीजचो-यांच्या संख्येऐवजी विजेच्या युनिटची अधिक चोरी होणाऱ्या ठिकाणी आता लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. परिणामी या विभागाने आतापर्यंत २०२१-२२ मध्ये सर्वाधिक ५५७.५३ दशलक्ष युनिटची वीजचोरी उघड केली आहे. याआधी जास्तीत जास्त १६८ दशलक्ष युनिटची वीजचोरी उघड करण्याचा या विभागाचा विक्रम होता. परंतु त्यापेक्षा तिप्पट वीजचोरी उघड करण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावण्यात आली आहे.

गेल्या आर्थिक वर्षात सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने कोकण प्रादेशिक विभागामध्ये ७८३४ ठिकाणी १५२ कोटी ४३ लाख, पुणे प्रादेशिक विभागात ५५२७ ठिकाणी ७२ कोटी, नागपूर प्रादेशिक विभागात ५५०३ ठिकाणी ६३ कोटी २३ लाख आणि औरंगाबाद प्रादेशिक विभागात ४१२३ ठिकाणी २९ कोटी ८० लाख रुपयांच्या वीजचो-या उघड केल्या आहेत.

वीजचोरी सहन करणार नाही

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नुकताच सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचा आढावा घेतला. त्यावेळी वीजचोरी ही महावितरणला लागलेली किड आहे. वीजचोरीचे प्रकार अजिबात सहन केले जाणार नाहीत. महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयासोबतच सुरक्षा व अंमलबजावणीच्या पथकांनी वीजचोरीविरुध्द कठोर कारवाई करावी, असे निर्देश दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...