आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदोबस्त:आरटीओ कार्यालयातील माफियांचा बंदोबस्त करा

श्रीरामपूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दलालांनी कब्जा घेतला आहे. या कार्यालयात परिसरात दलालांनी दहशत पसरवली आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे गाड्यांची पासिंग, खोट्या पावत्या (बी.एम.व्ही रिसिट) देणे, अशी अवैध कामे केली जातात. यातून लाखो रुपयांची कमाई करुन वाहनधारकांची फसवणुक केली जात आहे. सर प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करावी आणि आरटीओ कार्यालय दलालमुक्त करावे, अशी मागणी भाजप ओबीसी आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, जिल्हा टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल मुथा आदिंनी केली आहे.

यासंदर्भात प्रकाश चित्ते, सुनिल मुथा,बाबा शिंदे, अरुण पाटील, डॉ. दिलीप शिरसाठ, प्रविण पैठणकर, प्रविण फरगडे, अनिल थोरात, अमित मुथा, किशन ताकटे, सुरेश सोनवणे, संजय यादव आदींनी पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाला निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, बी.एम.व्हीच्या बनावट टक्स पावत्या देणे, बनावट व्यवसाय कर पावत्या, पर्यावरण कर पावत्या देणे, यासह विम्याची खोटी कागदे सादर करणे, ऑनलाईन डाटा करताना मॅन्युअल रेकॉर्डवरील रोड टॅक्सच्या नोंदीची पडताळणी न करताच वाहनांचा थेट १५ वर्षाचा टॅक्स भरल्याचे दाखवून अनेक वाहने वन टाईम टॅक्स केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

कार्यालयाच्या आवारात मारुती व्हान लावून हे उद्योग राजरोसपणे केले जातात. खोट्या कागदपत्रांसंदर्भात श्रीरामपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल असून त्याबाबत अद्याप काहीच प्रगती नाही. नेवासा येथेही एकाच नंबरच्या दोन वाहनेबाबतचा गुन्हाही प्रलंबित आहे. आरटीओ कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी ह्या माफियांच्या दहशतीखाली असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेवून चौकशी होवून संबंधित माफियाखोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

मूळ रेकॉर्डची पाने फाडून पुरावा नष्ट केला जाताे
नोंदवलेल्या वाहनांचे मुळ रेकॉर्डची पाने फाडून पुरावा नष्ट केला जातो. ऑनलाईन अपॉइन्टमेन्टसाठी विशिष्ट दलालांमार्फत मोठा मोबदला घेवून तात्काळ अपॉइन्टमेन्ट मिळते. मुळ मालकाच्या जागी बनावट व्यक्तीची पडताळणी करुन आर.टी.ओ. कार्यालयाची फसवणुक केली जाते. पासिंग ट्रॅकवरही दलालांची दादागिरी चालते. पासिंग ट्रॅकवर रिफ्लेक्टर, रेडियम, स्पीड गव्हर्नर आदी वाहनांच्या वस्तू अव्वाच्या सव्वा किमतीस विकतात. ड्रायव्हिंग लायसन्स व आर.सी. बुक कार्ड वितरणातही घोटाळा होतो.

बातम्या आणखी आहेत...