आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणुकीच्या कामाला प्राधान्य देत दक्ष राहून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले. निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी चार तास मॅराथॉन बैठक घेत आढावा घेतला.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, सर्व उपजिल्हाधिकारी, संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी भोसले म्हणाले की, विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील मतदान केंद्राची अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन त्या ठिकाणी कुठल्याही बाबींची उणीव भासणार नाही, याची खातरजमा करुन घ्यावी. मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, विद्युत व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, स्वच्छतागृह आदी सर्व सुविधा उपलब्ध राहतील, यादृष्टीने सुक्ष्म नियोजन करावे. दिव्यांग मतदारांना मतदानासाठी मतदान केंद्रामध्ये प्रवेशासाठी रॅम्पची उभारणी करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी भोसले यांनी यावेळी दिल्या.
विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान ईव्हीएमद्वारे न घेता मतपत्रिकेद्वारे करण्यात येते. त्यामुळे निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना ही प्रक्रिया समजून निवडणुकीची प्रक्रिया व कामकाज सुलभरित्या पार पाडण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे. प्रशिक्षणादरम्यान सर्व बाबींची अत्यंत बारकाईने माहिती देण्यात यावी. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या काही शंका असतील, तर त्यांचे निरसनही तातडीने करावे, अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.
निवडणुकीसाठी आवश्यक साहित्य, वाहने, पोलिस बंदोबस्त, भरारी पथकांच्या नियुक्त्या यासह इतर आवश्यक सर्व विषयांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेत सर्व अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करुन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.