आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामाजिक जाणिवेतून २० वर्षांपूर्वी शहरातील प्रमुख चौकाचौकांत उन्हाळ्याला प्रारंभ होताच सुरू होत असलेल्या पाणपोई आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पाणपोईंची जागा आता प्लास्टिकच्या बाटली बंद पाण्याने घेतली आहे. कोरोनानंतर आरोग्याप्रती वाढलेल्या जागरूकतेमुळे हॉटेल, लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमात बंद पाण्याच्या बाटल्याचा वापर होत आहे. नगर शहरात दररोज १ लाख ५० हजार पाण्याच्या बाटल्याची विक्री होते, हीच विक्री मे महिन्यात उष्णतेची तीव्रता वाढल्यानंतर प्रतिदिन पाच लाखांवर जाणार आहे. बाटलीबंद पाणी विक्रीतून महिन्याला जवळपास २९० कोटींपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल होते. गेल्या १५ वर्षांत आलेल्या आर्थिक सुबत्तेमुळे खाण्यापिण्याचा कल बदलला आहे. त्याला आता पाणी देखील अपवाद राहिलेले नाही. पाण्याच्या तहानेने व्याकुळ झालेल्यांना माठातील किंवा रांजणातील थंड पाणी मोफत मिळावे यासाठी विविध सामाजिक संस्थांकडून उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाणपोई सुरू केल्या जात होत्या. ग्रामीण भागातून शहरात बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्यांना पाणपोईतून स्वतःच्या हाताने थंड पाणी घेऊन पिता येत होते.
मात्र गेल्या काही वर्षात पाणपोई जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. नगर शहरात अवघ्या चार ते पाच पाणपोई सध्या सुरू आहेत. त्यातही पूर्वीसारखे रांजण किंवा माठ नाहीत तर अत्याधुनिक इलेक्ट्रिक फ्रिजचे थंड पाणी या पाणपोईवर मिळते. दहा वर्षांत पाणी बाटल्यांचा बाजार ८५ टक्क्यांनी वाढला आहे. दहा वर्षापूर्वी दररोज ३० हजार पाण्याच्या बाटल्यांची शहरात विक्री होत होती. नगर शहरात हॉटेल, रेस्टॉरंट याचबरोबर किरकोळ दुकानातून दररोज १ लाख ५० हजार बाटलीबंद पाण्याची विक्री होते. नगर शहरात विविध कंपन्यांच्या पाणी बाटल्या विक्रीसाठी येतात. ७ रुपयांपासून ते ८० रुपये किमतीच्या या पाण्याच्या बाटल्या बाजारात उपलब्ध आहेत. शहरात विविध कंपन्यांच्या बंद पाण्याच्या बाटल्यांची विक्री करणारे १४ डीलर आहेत.
सार्वजनिक कार्यक्रमांतही जारच्या पाण्याचा वापर
नगर शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फिल्टरने पाणी तयार करण्याचे अनेक कारखाने आहेत शिवाय बंद पाण्याच्या बाटल्या तयार करण्याचे कारखाने आहेत. सध्या सार्वजनिक कार्यक्रम असो किंवा घरगुती कार्यक्रम असो यात पिण्यासाठी जारचे पाणी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येते.
डीएसपी चौकातील पाणपोई भागवते शेकडोंची तहान
नगर शहरातील नगर -औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या डीएसपी चौकातउद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या निवासस्थानाच्या भिंतीजवळ २०१७ मध्ये छायाताई फिरोदिया यांनी अत्याधुनिक फ्रिज ठेवून पाणपोई सुरू केली होती. दररोज शेकडोंच्या संख्येने नागरिक या पाणपोईवर आपली तहान भागवतात.
अल्कालाइन व माठातील पाण्याची क्रेझ कायम
कोरोना नंतर आरोग्याप्रती वाढलेली जागृती लक्षात घेऊन अनेकजण फिल्टर युक्त पाणी तसेच अल्काइन पाणी पिण्यासाठी वापरत आहेत. शिवाय फ्रिज पेक्षा माठातील पाणी चांगले म्हणून अनेक जण माठातील पाण्यानेच आपली तहान भागवताना दिसतात.
मे मध्ये चार पटीने मागणी वाढेल
मार्च महिन्यात पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पाण्याच्या बाटल्याची मागणी कमी असली तरी पुढच्या एप्रिल, मे महिन्यात पाण्याची मागणी चार पटीने अधिक वाढणार आहे. मे महिन्यात नगरला दररोज पाच लाख पाण्याच्या बाटल्या लागतील. हॉटेल, रेस्टॉरंट, हॉस्पिटल, केटरर्स व घरगुती कार्यक्रमांसाठी पाण्याच्या बाटलीची मागणी असते. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन एक महिना अगोदर जास्त पाण्याच्या बॉटलची ऑर्डर द्यावी लागते. अतुल सातपुते, प्रमुख पाणी बाटली वितरक, बागगडपट्टी
शहाजी चौकात ३५ वर्षांपूर्वी सुरू झाली होती पहिली पाणपोई
नगर शहरात येणारे ग्राहक बहुतांशी ग्रामीण भागातून येत होते. १९८५ या कालावधीत नगर शहरात व्यापारी असोसिएशन संघटनेने शहाजी चौक येथे पहिली पानपोई सुरू केली होती.नगर शहरातील ही पहिली पाणपाेई होती.त्यानंतर पानपोईंची संख्या वाढत गेली.आता मात्र बोटावर मोजण्या इतक्याच पाणपोई उरल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.