आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांस्कृतिक वारशा:संगमनेरला लाभलेल्या सांस्कृतिक वारशाचा प्रत्येकाला अभिमान

संगमनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेरला सांस्कृतिक वारसा लाभला आहे. १४ वर्षांपासून राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असलेल्या संगमनेर फेस्टिव्हलचे आयोजन करत आहे. हा महोत्सव आज राज्यभर गाजत आहे. संगमनेरकरांना त्याचा अभिमान वाटावा, अशा दिमाखात तो साजरा होत असल्याचे प्रतिपादन एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक डॉ. जयश्री थोरात यांनी केले.

राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूहाने आयोजित केलेल्या संगमनेर फेस्टिव्हलचा त्यांच्या हस्ते शुभारंभ झाला, या प्रसंगी डॉ. थोरात बोलत होत्या. मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी, प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे, पोलिस उपअधीक्षक राहुल मदने, तहसिलदार अमोल निकम, माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड, विश्‍वास मुर्तडक, फेस्टिव्हलचे अध्यक्ष मनिष मालपाणी, कार्याध्यक्ष रोहित मणियार, उपाध्यक्ष सम्राट भंडारी, सचिव आशिष राठी, उमेश कासट उपस्थित होते.

डॉ. थोरात म्हणाल्या, कोरोनामुळे २ वर्षांचा खंड पडलेला गणेशोत्सव यंदा मोठ्या थाटात साजरा होत आहे. राज्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाल्यापासून संगमनेरातही हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. येथील विविध संस्था, मंडळे व नागरिकांकडून शहराची सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचे मोठे काम होत आहे. संगमनेर फेस्टिव्हलने तर राज्यात लौकिक मिळवला असल्याचे त्यांनी सांगितले.

राजेश मालपाणी यांनी निर्बंधानंतर सर्वाधिक उत्सुकता लागलेला महोत्सव अशा शब्दात संगमनेर फेस्टिव्हलचे कौतुक केले. प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे यांनी पुणे फेस्टिव्हलच्या धर्तीवर १४ वर्षांपासून साजर्‍या होणाऱ्या संगमनेर फेस्टिव्हलची दरवर्षी उंची वाढत असल्याचे सांगितले. मनिष मालपाणी यांनी प्रास्तविकात फेस्टिव्हलचा १४ वर्षांचा प्रवास उलगडत, संगमनेरकर प्रेक्षक रसिक असल्याने दरवर्षी फेस्टिव्हलमधील कार्यक्रमांची निवड करताना ते दर्जेदारच असतील याची काळजी घ्यावी लागते. दोन वर्षांच्या खंडानंतर यावर्षी विसर्जनाच्या मिरवणुका मोठ्या जल्लोशपूर्ण वातावरणात निघणार असल्याने प्रशासनाने रात्री बारानंतर पारंपरिक वाद्यांसह मिरवणूकीला परवानगी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. संगमनेर फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध मराठी विनोदवीर सारंग साठ्ये व सिद्धांत बेलवणकर यांच्या धमाल विनोदाचा कार्यक्रम सादर झाला. रोजच्या जीवनातील विविध प्रसंग एकत्रित करीत त्यातून घडणार्‍या गमतीजमती ऐकताना मालपाणी लॉन्सच्या प्रशस्त प्रांगणात क्षणाक्षणाला हास्याचे फवारे उडत होते. सूत्रसंचालन रमेश घोलप यांनी, तर आभार सम्राट भंडारी यांनी मानले.

साहसी खेळाचे प्रदर्शन
मल्हार ढोलताशा पथक व संगमनेर डान्स स्टुडिओच्या कलाकारांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. चंद्रशेखर कानडे व सहकाऱ्यांनी पारंपरिक साहसी खेळाचे प्रदर्शन केले. मालपाणी उद्योग समूहाच्या सुरक्षारक्षकांनी तालबद्ध पद्धतीने संचलन करीत फेस्टिव्हलची ज्योत आणली. मनिष मालपाणी यांच्या हस्ते उद्घाटक डॉ. जयश्री थोरात यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर फेस्टिव्हलचा शुभारंभ झाला.

बातम्या आणखी आहेत...