आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचल गं सुंदरा, आपण जाऊ डोंगरा, आम्ही जाऊन डोंगरा, खातो करवंद रानमेवा//" हे आदिवासी लोकगीत चालीवर गाऊन बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. निमित्त हाेते. अकोले तालुक्यातील पिंपळगाव नाकविंदा येथील महालक्ष्मी विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे. यावेळी राहीबाई पोपेरे यांनी सर्वांनीच मानवी आरोग्याबाबत सतर्क राहून शहरी व ग्रामीण भागातील लोकांनी आपल्या दैनंदिन भोजनात विषमुक्त अन्नधान्य व गावरान वाण दररोजच खावेत.
ते उपलब्ध होण्यासाठी इमारतीच्या टेरेसवर, घराच्या परसबागेत, घरापुढील व घरामागील जागेवर, कुंडीत, शेतातून व ते मिळवण्यास शक्य होईल त्या सर्व ठिकाणांहून विषमुक्त अन्नधान्य उपलब्ध करण्याबाबत जनजागृती करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. अगस्ती रूरल एज्युकेशन सोसायटी अकोले, संचालित महालक्ष्मी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळगाव नाकविंदा येथे वार्षिक पारितोषिक वितरणप्रसंगी अध्यक्षस्थानी अगस्ती रूरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. वसंतराव मनकर हाेते.
यावेळी नाशिक बायफ संस्थेचे विभागीय अधिकारी जितीन साठे, साहित्यिक सूर्यकांत शिंदे, अकोले तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय पोखरकर, संस्थेचे कार्यकारणी सदस्य भाऊसाहेब कासार, प्रमोद मंडलिक, भाऊसाहेब काळे, शहबाज शेख, सर्वोदय विद्या मंदिर खिरविरेचे प्राचार्य लहानू पर्बत, प्राचार्य सुनील धुमाळ, अहमदनगर शिक्षक बँकेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब ढगे, कबड्डी असोसिएशनचे राज्य पंच अनिल चासकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष वाळीबा लगड अादी उपस्थित होते. अॅड. वसंतराव मनकर, जितीन साठे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
कला, क्रीडा क्षेत्रात नैपुण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. यावेळी अॅड. वसंतराव मनकर यांचा वाढदिवस केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य सुनील धुमाळ यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक रामदास कासार यांनी केले. विजय भालेराव यांनी आभार मानले.
गरिबीला लाजू नका व श्रीमंती असेल तर माजू नका पद्मश्री पोपेरे म्हणाल्या, दुसऱ्याकडे जे चांगले आहे ते घ्या. गरिबीला लाजू नका व श्रीमंती असेल तर माजू नका. भविष्यात चांगले तेच काम करा. शेतकऱ्यांनी माती चांगली राखली तरच अन्न चांगले मिळेल, आणि अन्न चांगले तरच आपली व पुढची पिढी चांगली जगेल. म्हणूनच आपण निसर्गाला धरून चला. आजाराला बळी पडू नका. त्यासाठी मेहनत करा, सातत्य ठेवा, निसर्गाची शाळा शिकून खूप मोठे व्हा, असा सल्ला पोपेरे यानी दिला. बिजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे, अॅड वसंतराव मनकर, जितीन साठे, सुर्यकांत शिंदे, विजय पोखरकर, भाऊसाहेब कासार, प्रमोद मंडलिक प्राचार्य लहानू पर्बत, प्राचार्य सुनिल धुमाळ यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.