आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरप्रकार:कागदपत्रात छेडछाड करून गाड्या पासिंग करून घेण्याचा प्रकार उघड

श्रीरामपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर परिवहन कार्यालयातील वाहन परवान्यासाठी व्यवसाय कर भरल्याची विना क्रमांकाची पावती दिली जात असल्याची तक्रार ताजी असतानाच आता कागदपत्रात छेडछाड करून गाड्या पासिंग करून घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पाच वाहन मालकांसह त्याना मदत करणाऱ्या एजंट विरोधात श्रीरामपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत मोटार वाहन निरीक्षक विनोद घनवट यांनी श्रीरामपूर शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादित म्हटले आहे, वाहन परवाना असणाऱ्या गाड्या दरवर्षी पासिंग कराव्या लागतात. बाहेरील परिवहन कार्यलयात नोंदणी केलेली गाडी पासिंग करतांना त्या परिवहन कार्यालयाची एनओसीची गरज असते. मात्र एमएच २५ पी ४६४५, एमएच एफव्ही ४८३७, एमएच १२ केपी ७१३०, एमएच ४५ टी १६३७, एमएच ११ बीएल ०१२१ ही वाहने पासिंगसाठी श्रीरामपूर परिवहन कार्यालयात आली होती. त्यांची तपासणी करून आपण पासिंग करीत असताना आपणास शंका आली. म्हणून या वाहनांची एनओसी जोडली आहे का याची खातरजमा केली.

त्यावेळी एनओसी जोडलेली दिसली नाही. अधिक खोलात जाऊन कागदपत्रांची पडताळणी केली असता कागदपत्रात छेडछाड केल्याचे व त्यांचे फिटनेस प्रमाणपत्र तयार करून ती श्रीरामपूर परिवहन कार्यालयात नोंदणी केल्याचे दाखवण्यात आल्याचे लक्षात आले. त्यावरून या वाहन मालकांविरोधात व त्यांना मदत करणाऱ्या एजंटांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता ही वाहने कुठली आहेत व कोणत्या परिवहन कार्यालयात त्यांची नोंदणी आहे व त्यांचे मालक कोण, त्यांना मदत करणारे एजंट कोण, याचा आता पोलिस शोध घेत आहेत.

मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता ज्यांच्या वाहनांची काही समस्या आहे. त्यामुळे त्यांची एनओसी मिळू शकत नाही अशा वाहनांचे मालक एजंटाना मोठी रक्कम देऊन वाहने पासिंग करून घेण्याचा प्रयत्न करतात. आता असा प्रकार करण्याचा प्रयत्न झाल्याने यापूर्वीही अशी वाहने श्रीरामपूर कार्यालयात मोठ्या प्रमाणावर पासिंग झाली असण्याची शक्यता असल्याने मोठे रॅकेट बाहेर येण्याची शक्यता आहे. तसे झाले तर वाहन मालक, एजंट व अशी वाहने पासिंग करणारे अधिकारी कर्मचारी पोलिसांच्या रडारवर येणार आहेत.

विना क्रमांक पावत्या देण्याचा प्रकार वाहन परवान्यासाठी व्यवसाय कर भरुन त्याची पावती सादर केल्यावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून परवानगी दिली जाते.व्यवसाय कर भरल्याची पावती वाहनधारक स्वतः घेवून गेला तर पावतीवर नंबर नाही, असे सांगून अधिकारी परवाना नाकारला जात होता. माञ तीच पावती एजंट घेवून गेला तर मात्र परवाना दिला जात असल्याच्या तक्रारीही झाल्या होत्या. आता असा प्रकार उघड झाल्याने श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात अजूनही एजंटांचा सुळसुळाट असल्याचे दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...