आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाच वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचा संप पुकारून पुणतांब्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी संपूर्ण राज्य शासन व महाराष्ट्राला जागे केले होते. आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुणतांबा येथेच सर्वपक्षीय शेतकरी आंदोलन सुरू झाले आहे. शेतमालाला भाव मिळत नसल्याने राज्य शासनाचा निषेध म्हणून कष्टाने पिकवलेला पालेभाज्या, टरबूज, भाज्या, द्राक्षे इ. नागरिकांना मोफत वाटायला सुरवात केली आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटुंब रात्रंदिवस शेतात राबून-घाम गाळून उत्पन्न करत असलेला शेतमाल कवडीमोल भावात विकावा लागतो. उत्पादन खर्चही मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. तरीही राजकर्ते केवळ राजकारण करण्यातच मग्न आहेत, अशी टीका कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केली आहे.
वहाडणे म्हणाले, आता तर सनदशील शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या प्रमुख शेतकरी नेत्यांना कोरोनाचे कारण पुढे करून नोटीसाही बजावण्यात आलेल्या आहेत. सर्वच राजकीय पक्ष स्वतःच्या राजकारणासाठी प्रचंड गर्दी जमा करून सभा-मेळावे घेताहेत. कोरोनाचे कारण देऊन राजकीय कार्यक्रम का रद्द केले जात नाहीत. अशा प्रकारे शेतकरी आंदोलन होऊच नये म्हणून प्रयत्न करणाऱ्या शासन व प्रशासनाचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. खरे तर शासनाने त्वरित या आंदोलनाची, शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेणे अत्यंत आवश्यक आहे. यानंतर राजकिय पक्षांचे नेते-पदाधिकारी येऊन आंदोलकांना भेटून पाठींबा व्यक्त करतील, एकमेकांना दोष देतील. पण यातून निष्पन्न काहीच होणार नाही.
हे आंदोलन फार चिघळू न देता शासनाने त्वरित हालचाल करून त्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. शेतकरी आंदोलकांना कोरोनाचे कारण दाखवून नोटीसा दिल्या त्याचप्रमाणे राजकीय नेत्यांनाही नोटीस देऊन त्यांच्याही सभा मेळावे थांबवून दाखवावेत. शेतकरी कंगाल होत असताना शासनातील शेतकरी पुत्र नेत्यांचीच भरभराट का? याचाही विचार शेतकऱ्यांनी व नागरिकांनी केला पाहिजे, असे वहाडणे म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.